rat५p२८.jpg-
२५N८९६९९
तालुक्यातील गोळप कट्टा कार्यक्रमांमध्ये संगीत शिक्षक श्री मिलिंद गोवेकर यांची मुलाखत घेताना कट्ट्याचे आयोजक श्री अविनाश काळे
-------
छंद जोपासताना करिअर निर्माण झाले
मिलिंद गोवेकर ः गोळप कट्टावरील ७०वी मुलाखत
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. ५ ः लहानपणापासून घरी संगीत व नाटक यांचे वातावरण असल्यामुळे माझ्यामध्ये नैसर्गिकपणे ते गुण उतरले. आईने अनेक नाटकांमध्ये काम केले आहे तर वडील अनेक वाद्य वाजवायचे, ते पाहून मला आवड निर्माण झाली. त्यामुळे लहानपणापासून सर्व वाद्ये वाजवायची त्यातूनच माझ्या कलेला वाव मिळाला. आवडीतून छंद जोपासताना त्यातून माझे करिअर निर्माण झाले, असे भाट्ये येथील संगीत शिक्षक संयोजक मार्गदर्शक ऱ्हिदम आर्टिस्ट गिटारिस्ट मिलिंद गोवेकर यांनी आपल्या वाटचालीबाबत सांगितले.
तालुक्यातील गोळपकट्टाच्या ऑगस्ट महिन्यातील तिसऱ्या शनिवारी ७०व्या कार्यक्रमात मान्यवर म्हणून भाटये येथील संगीतशिक्षक, संयोजक, मार्गदर्शक, ‘ऱ्हिदम आर्टिस्ट आणि गिटारिस्ट’ असलेले मिलिंद गोवेकर यांनी आपला प्रवास अविनाश काळे यांनी घेतलेल्या मुलाखतीच्या माध्यमातून सांगितला. गोवेकर म्हणाले, आमचं मूळ गाव वायंगणी. बालपण टिळक आळी येथे गेले. शिक्षण फाटक हायस्कूल येथे झाले त्यानंतर आयटीआय केलं. घरी संगीत आणि नाटक याचे वातावरण असल्याने माझ्यामध्ये नैसर्गिकपणे ते उतरले. लहानपणापासून मला कोंगो, बोंगो, कीबोर्ड अशी अनेक वाद्ये वाजवता येत होती. बाबा जिकडे जातील तिकडे मी पण साथीला जात असे. ट्यूनर्स नाईट या ऑर्केस्ट्रामध्ये बाबा वाद्ये वाजवत असत. त्या ऑर्केस्ट्रामध्ये माझा कोंगो वादनाचा पंधरा मिनिटाचा विशेष कार्यक्रम असे. आकाशवाणीवर माझी मुलाखत झाली होती तिथे मी पाच वाद्ये वाजवून दाखवली होती.
भारती शिपयार्ड येथे नोकरीला लागलो; मात्र संगीताची वाद्यांची आवड असल्याने त्यातच करिअर करावे म्हणून नोकरी सोडून मुंबईला गेलो. तिथे मोहन आचरेकर यांच्यामुळे रेस्टॉरंटमध्ये बँडमध्ये ड्रमर म्हणून काम मिळाले. तिथेच सांबासरांची ओळख झाली. ते फ्रँको यांचे शिष्य जे आर. डी. बर्मन यांच्याबरोबर ड्रमर होते. सांबा सरांकडून संगीतातील खूप सखोल ज्ञान मिळाले. यानंतर रत्नागिरीतील कलाकार मित्र विजय शिवलकर यांच्यामुळे त्या वेळचा प्रसिद्ध ऑर्केस्ट्रा सेव्हन कलर्समध्ये ऱ्हिदम आर्टिस्ट म्हणून संधी मिळाली. त्याचे ठिकठिकाणी असंख्य दौरे झाले. या दरम्यान, मला प्रसिद्ध गायक कुमार सानू यांच्याबरोबर केनियामध्ये परदेश दौऱ्याची संधी मिळाली. तिथेच विश्रांतीच्या वेळी एक दिवस मी छंद म्हणून माझी एकॉस्टिक गिटार खोलीत वाजवत बसलो असताना आमचे आयोजक आत मी गिटार वाजवत बसलेले पाहून आश्चर्यचकित झाले.
-----
स्टुडिओ उभारण्याची इच्छा
आपल्या व्यवसायाबद्दल बोलताना गोवेकर म्हणाले, भविष्यात स्वतःचा मोठा स्टुडिओ उभारायची इच्छा आहे. जुने संगीत आणि आताचे संगीत याबाबत बोलताना ओरिजनल संगीत हे नेहमीच उजवे आणि त्यात गोडवा असतो.