फुलवडे ता. ५ ः फुलवडे (ता. आंबेगाव) येथे थ्रिफेज वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तसेच, भारतीय दूरसंचार निगमने याठिकाणी उभारलेल्या मनोऱ्याची सेवा वेळोवेळी खंडित होत असल्याने गावातील नागरिकांना संपर्कासाठी अडचण निर्माण होत आहे. या दोन्ही विभागांनी याबाबतची दखल घेऊन सेवा तत्काळ अखंडितपणे सुरू कराव्यात, अशी मागणी सरपंच बबन मोहरे व सर्व सदस्य तसेच सर्व ग्रामस्थांनी केली आहे.
गावात पावसाळ्याच्या दिवसात नेहमी वीजपुरवठा खंडित होत असतो. खंडित झालेला वीजपुरवठा पूर्ववत होण्यासाठी अनेक दिवसांची प्रतीक्षा करावी लागते. याठिकाणी ग्रामपंचायत कार्यालय, टपाल कार्यालय, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, रेशनिंग दुकान, पतसंस्था, भगतवाडी, नंदकरवाडी व मोहरेवाडी या तीन जिल्हा परिषद शाळा, हायस्कूल, वसतिगृह व एक निवासी आश्रमशाळा आहे. या सर्व ठिकाणी वीजपुरवठा व मोबाईल नेटवर्क या महत्त्वाच्या बाबी आहेत. या सुविधा उपलब्ध नसतील तर कामकाज ठप्प होते.
थ्रिफेज वीजपुरवठा खंडित झाल्याने ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्याअभावी मोठी गैरसोय होते. वापरासाठी लागणाऱ्या पाण्याची गरज पावसाच्या पाण्यावर भागवली जाते. मात्र, विहीर व बोअरवेलचे विद्युत पंप सुरू होत नसल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होत आहे.
तसेच, येथील बीएसएनएलचा मनोरा हा दिवसेंदिवस वादाचा मुद्दा बनला आहे. ग्राहकांनी केलेला मोबाईल रिचार्ज नेटवर्क नसल्याने वाया जात आहे. त्यामुळे ग्राहकांना भुर्दंड सहन करावा लागत आहे. महिन्यातून दोन तीन दिवस सेवा मिळते. मात्र, खंडित झालेली सेवा पूर्ववत होण्यासाठी अनेक दिवसांची प्रतीक्षा करावी लागते. संबंधित विभागांनी याबाबत तत्काळ लक्ष देऊन सेवा पूर्ववतपणे सुरू करावी, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.