मंचर, ता. ५ : श्रीक्षेत्र वडगाव काशिंबेग (ता.आंबेगाव) येथे गणेशोत्सवानिमित्त सुरू असलेल्या यात्रेदरम्यान ग्रामस्थांना दोन बिबट्यांचे दर्शन झाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बुधवारी (ता.३) व गुरुवारी (ता.४) रात्री नऊच्या सुमारास हे बिबटे गावात फिरताना दिसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. अनेक तरुणांनी या बिबट्यांचे चित्रीकरण करून सोशल मीडियावर व्हायरल केले आहे.
या प्रकारामुळे यात्रेतील आरत्या व अन्य धार्मिक कार्यक्रमांवर परिणाम झाला असून ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. “मंचर वनपरिक्षेत्र कार्यालयाने तातडीने पिंजरे बसवून बिबट्यांना जेरबंद करावे.” अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे. दरम्यान, वडगाव काशिंबेग येथील बाळू शांताराम राजगुरू यांच्या मोठ्या शेळीवर सोमवारी (ता.१) पहाटे तीनच्या सुमारास बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली. वनखात्याने पाहणी केली असली तरी अद्याप पिंजरा बसवण्यात आलेला नाही. ग्रामस्थांच्या सांगण्यानुसार बिबट्या रोज संध्याकाळी सातनंतर टेके आळी परिसरात वावरतो. गुरुवारी रात्री नऊ वाजता बिबट्या राजगुरू यांच्या घराच्या मागे दिसल्याचे त्यांनी सांगितले.