Kolhapur Crime News : कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहापूर पोलिसांनी हद्दपारीची धडक मोहीम राबवली. मात्र, या कारवाईत मृत व्यक्तीच्या नावावरही हद्दपारीचा प्रस्ताव दाखल झाल्याचे समोर आले. यामुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मोहिमेत तब्बल ६४ गुन्हेगारांविरोधात हद्दपारीचा प्रस्ताव तयार करून नोटिसा बजावल्या. मात्र, या कारवाईतील गैरप्रकार उघडकीस आला. सहा महिन्यांपूर्वी मृत झालेल्या व्यक्तीच्या नावावरही पोलिसांनी हद्दपारीचा प्रस्ताव दाखल केल्याचे समोर आले. कारंडे मळा येथील अस्लम नुरमहंमद सोलापुरे या व्यक्तीचा मृत्यू सहा महिन्यांपूर्वी झाला होता.
मात्र, शहापूर पोलिसांनी मृत व्यक्तीच्याही नावावर हद्दपारीचा प्रस्ताव तयार करून तो अपर तहसील कार्यालयात दाखल केला. संबंधित प्रस्तावावर शिक्कामोर्तब होऊन नोटीस बजावण्यासाठी पोलिस सोलापुरे यांच्या घरी गेले असता तो मृत झाल्याचे उघडकीस आले. तसेच मृत व्यक्तीवर कारवाई केल्याने पोलिसांच्या तपासातील निष्काळजीपणा आणि जबाबदारीची कमतरता स्पष्ट झाली.
दरम्यान, शहापूर पोलिसांनी हद्दपार असतानाही हद्दीत फिरताना दोघांना पकडून त्यांच्यावर कारवाई केली आहे. युवराज ऊर्फ बाळू शिवाजी पताडे (वय ३४, रा. गणेशनगर) आणि अल्ताफ मिरासो शेख (४२, रा. संगमनगर) अशी त्यांची नावे आहेत.
Kolhapur Friend Killed : ६० वर्षांची मैत्री एका शिवीमुळे संपली, जिवलग मित्रानेच धारधार शस्त्राने केला खून; दोघेही ७३ वयाचे, असा आहे घटनाक्रम...एकीकडे नावे गुप्त, दुसरीकडे मृत हद्दपार
दरवर्षी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस दलाकडून हद्दपार गुन्हेगारांची नावे जाहीर करून नागरिकांना पारदर्शक माहिती दिली जाते. मात्र, यंदा पोलिसांनी ती नावे गुप्त ठेवून केवळ भलीमोठी आकडेवारी जाहीर केली. त्यात सहा महिन्यांपूर्वी मृत झालेल्या व्यक्तीचे नाव हद्दपारीच्या यादीत समाविष्ट झाल्याने मोठा गैरप्रकार उघड झाला आहे.