rat५p२७.jpg-
२५N८९६८०
संगमेश्वर -संगमेश्वर डिंगणी रस्त्याची पूर्णतः दुर्दशा झाली आहे.
संगमेश्वर डिंगणी रस्त्याची चाळण
जागोजागी चिखल-खड्डे ; वाहनचालकांची कसरत
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. ५ : संगमेश्वर डिंगणी रस्ता पूर्णपणे खड्डेमय झाला आहे. हा रस्ता गणपतीपुळेकडे जाण्यासाठी महत्त्वाचा आहे. संगमेश्वर-डिंगणी या खाडीपट्ट्यातील रस्त्यावरून दहा ते पंधरा गावातील लोक प्रवास करतात. जवळचा रस्ता असल्याने गणपतीपुळ्याकडे जाणारे भक्तगण या रस्त्यानेच जातात. सद्यःस्थितीत या रस्त्याची पूर्णतः दुर्दशा झाली आहे.
या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. दोन्ही बाजूंच्या साईडपट्ट्यांवर चिखलाचे साम्राज्य आहे. त्यात भर म्हणून सीएनजीची अवजड वाहने दोन्ही बाजूंना उभी करून ठेवलेली असतात. त्यांनी तर चिखलच करून ठेवला आहे. रस्त्यावरून गाडी चालवणे अवघड झाले आहे. सगळ्या रस्त्यावर चिखल, सगळीकडे खड्डेच खड्डे असून मोठमोठ्या खड्ड्यांमुळे अपघात होत आहेत. रस्त्यावरून प्रवास करताना जणू काय आपण होडीतच बसलो आहे, असा अनुभव येत आहे. या रस्त्यावरून वाहनाने किंवा पायी जाणे म्हणजे अपघाताला आमंत्रणच आहे. पायी चालत जायला साईडपट्टीच राहिलेली नाही. जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो.
सार्वजनिक बांधकाम विभागाने, लोकप्रतिनिधी, गावपातळीवर असणारे कार्यकर्ते यांनी लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती लवकरात लवकर करावी. सीएनजी अवजड वाहनांची पार्किंग व्यवस्था अन्य कुठेतरी करावी. सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच लोकप्रतिनिधींनी एक दिवस प्रवास करून अनुभव घेण्याची मागणी वाहनचालकांनी केली आहे.