औसा (जि. लातूर) - ‘मला शोधू नका, मी सापडणार नाही’ असे नातेवाइकांना फोनद्वारे सांगून एका पन्नास वर्षीय व्यक्तीने रस्त्यालगतच्या झुडपात स्वतःवर काचेने वार करून जीवन संपविले. मानसिक तणावातून त्यांनी हे कृत्य केले असावे, असा अंदाज असला तरी पोलिस नेमक्या कारणाचा शोध घेत आहेत.
औसा-लातूर मार्गावरील कारंजे खडी केंद्राच्या परिसरातील जुना सेलू रस्त्याच्या कडेला शुक्रवारी (ता. ५) सकाळी दहाच्या सुमारास एक व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. पोटाला गंभीर जखमा होऊन अतिरक्तस्त्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला. औसा पोलिसांनी अधिक तपास केला असता अनंत तात्येराव शिंदे (वय ५०, रा. कळमगाव, ता. शिरूर अनंतपाळ, जि. लातूर) असे त्यांचे नाव असल्याचे समोर आले.
औसा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कळमगाव येथील अनंत शिंदे मानसिक तणावाखाली होते. त्यातून त्यांनी ‘मला शोधू नका, मी तुम्हाला सापडणार नाही’, असे नातेवाइकांना फोन करून सांगितले होते. मानसिक तणावाखालीच त्यांनी कारंजे खडी केंद्राच्या बाजूला असलेल्या कमी रहदारीच्या जुन्या सेलू रस्त्यावरील एका झुडपात काचेची बाटली फोडली. काचेने पोटात वार करून घेतले. त्यात ते गंभीर जखमी झाले. अति रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.
गंभीर अवस्थेतही व्हिडिओ कॉल
गंभीर जखमी झालेल्या अवस्थेतही शिंदे यांनी नातेवाइकांना व्हिडिओ कॉल करून आपण जीवन संपवत असल्याचे सांगितले. याबाबत राजेंद्र शिंदे यांच्या फिर्यादीनुसार औसा पोलिसांनी अकस्मात मृत्यू म्हणून नोंद केली आहे. त्यांच्या आत्महत्येमागच्या नेमक्या कारणाचा शोध पोलिस घेत आहेत.