७५ कोटीच्या दुरुस्तीनंतरही ''करुळ कोसळतोय''
esakal September 07, 2025 02:45 PM

swt516.jpg
89750
करुळः घाटात भली मोठी दरड कोसळल्याने हा घाटमार्ग १२ सप्टेंबरपर्यत बंद केला आहे. दरड हटविण्याचे काम युध्दपातळीवर सुरु आहे.

‘करुळ कोसळतोय’
७५ कोटीच्या दुरुस्तीनंतरही वाहतुक बंदची नामुष्की; नुतकरणातील कच्च्या दुव्यांमुळे घाट धोकादायकच
एकनाथ पवार ः सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. ५ ः दरडी फोडण्यासाठी केलेला ब्रेकरचा वापर, दरडी रोखण्यासाठी न केलेल्या सक्षम उपाययोजना आणि भौगोलिक परिस्थितीचा विचार न करताच केलेले काम यामुळे ७५ कोटी रूपये खर्चून केलेला करूळ घाटरस्यात दरडी कोसळण्याचे सत्र सुरूच आहे. राष्ट्रीय महामार्गावरील या घाटमार्गाची वाहतुक सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्याची नामुष्की प्रशासनावर ओढविली आहे. त्यामुळे नुतनीकरणाचा खरच काही उपयोग झाला आहे का? असा प्रश्न आता वाहनचालकांमधून विचारला जात आहे.
तळेरे-कोल्हापुर या राष्ट्रीय महामार्गाच्या काँक्रीटीकरणाला केंद्रीय बांधकाम विभागाने टप्प्याटप्प्याने मंजुरी दिली आहे. पहिल्या टप्प्यात कळे ते कोल्हापूर या १६ किलोमीटरच्या काँक्रीटीकरणाकरीता १७१ कोटी आणि त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात करूळ घाट आणि कोकिसरे ते नाधवडे अशा २१ किलोमीटरचा समावेश होता. २१ किलोमीटरमध्ये ९.६ किलोमीटर लांबीच्या करूळ घाटरस्त्याचा समावेश आहे. या कामांची निविदा प्रकिया विविध कारणांनी रखडली. त्यामुळे प्रत्यक्षात करूळ घाट रस्त्यांचे काम २२ जानेवारी २०२४ ला सुरू करण्यात आले. या रस्त्याच्या कामांसाठी तब्बल १४ महिने हा घाटरस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात आला होता. घाटरस्त्यांमध्ये ६५ मोऱ्या, साडेचार किलोमीटर लांबीच्या संरक्षक भिंती, सात मीटर रूंदीचा रस्ता, दरडीकडील बाजुला गटार यांसह विविध कामांचा समावेश होता.
प्रत्यक्षात करूळ घाट हा पाच मीटर रूंदीचा होता. त्यामुळे दोन मीटर रूंदी वाढविण्यासाठी करूळ घाटात अनेक ठिकाणी स्थिरस्थावर झालेल्या दरडींना हात घालण्यात आला. यावेळी भौगोलिक परिस्थितीचा अजिबात विचार केलेला नाही. गेल्या चार-पाच वर्षात घाटरस्त्यात दरडी कोसळण्याचे प्रकार थांबले होते. अपवादात्मक दरडी कोसळण्याचा एखादा दुसरा प्रकार घडला असेल. मात्र, घाट वाहतुक सुरळीत सुरू होती. परंतु, घाटरस्त्यातील दरडी हटविताना ब्रेकर आणि काही यंत्रसाम्रगीचा वापर करण्यात आला. हे करताना कसलाही विचार केलेला नाही.
रस्ता दोन मीटरने वाढला परंतु रस्त्याच्या डोक्यावर ढिल्या केलेल्या ढिगभर दरडी महामार्ग प्रधिकरणने तयार करून ठेवल्या. त्यामुळे रस्ता काम पुर्ण झाल्यानंतर पुढील चार पाच वर्ष दरडी कोसळणार हे निश्चित झाले होते. त्याची अनुभुती गेल्यावर्षी काम सुरू असतानाच आली.अनेकदा मोठ्या प्रमाणात दरडी कोसळल्या. इतक्या मोठ्या प्रमाणात दरडी कोसळत असतताना महामार्ग प्रधिकरणने गेल्या वर्षीच दरडी रोखण्यासाठी काही उपाययोजना करणे आवश्यक होते. यापुर्वी बोल्डर नेटचा वापर केला होता आणि तो यशस्वी देखील झाला होता.
परंतु, त्या दृष्टीने काही उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. परिणामी कोल्हापूर आणि कोकणला जोडणाऱ्या या घाटरस्त्यात सतत दरडी कोसळत आहेत. १२१ कोटीपैकी ७५ कोटी रूपये घाटरस्ता नुतनीकरणावर खर्च झाल्याचा अंदाज आहे. परंतु, नियोजनशुन्य कामामुळे मोठ्या प्रमाणात दरडी कोसळत आहेत आणि यापुढील तीन-चार वर्ष दरडी कोसळत राहणार आहेत.
गुरूवारी (ता.४) कोसळलेली दरड या वर्षातील सर्वात मोठी होती. या दरडीने संपुर्ण महामार्ग प्रधिकरण, ठेकेदार आणि एकुणच प्रशासनाच्या दर्जेदार कामांचे पितळ उघडे पाडले आहे. त्यामुळे प्रशासनावर १२ सप्टेंबरपर्यत घाटमार्ग बंद ठेवण्याची नामुष्की ओढविली आहे.

वराती मागून घोडे
करूळ घाटात दरड कोसळली आणि अनेक ठिकाणी कोसळण्याची स्थिती आहे. त्यामुळे प्रशासनाने आता भुगर्भ तज्ञांच्या टीमला पाचारण केले आहे. ही टीम करूळ घाटरस्त्यांची पाहणी करणार आहे. खरे तर रस्ताकाम सुरू करण्यापुर्वीच भुगर्भ तज्ञांकडून कोणत्या पध्दतीने काम करावे, याची माहीती घेणे आवश्यक होते. मात्र, आता वराती मागून घोडे नाचविले जात असल्याची टिका सामान्य वाहनचालकांतून केली जात आहे.

कोट
करूळ घाटात तीन ते चार ठिकाणी दरडी कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईतून तज्ञांचे पथक करूळ घाट पाहणीकरीता आले आहे. यामध्ये दोन भुगर्भ तज्ञ, वरिष्ठ इजिनिअर आणि अधिकाऱ्यांचा समावेश आहे. पाहणीअंती ते उपाय सुचवितील त्याप्रमाणे पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.
- पवन पाटील, शाखा अभियंता, महामार्ग प्रधिकरण
----------------
एक नजर...
* साडेनऊ किलोमीटरच्या करूळ घाटात दरडी कोसळतील अशी सहा ते सात धोकादायक ठिकाणे
* घाटरस्ता नुतनीकरणासाठी ७५ कोटी खर्च
* संरक्षक भिंती देखील कोसळण्याची शक्यता
* तज्ञांच्या सल्ल्यावर वाहतुकीची दिशा ठरणार
---------------

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.