केज : सर्वोच्च न्यायालयाने ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी डीजे मुक्त वातावरणात पारंपारिक वाद्यांच्या तालावर गणरायांची मिरवणूक काढण्याचे निर्देश दिले आहेत. त्यातच शहरातून जाणाऱ्या एका डीजे असलेल्या वाहनास थांबवून केज पोलीसांनी शनिवारी (ता.०६) कारवाई केली. यापुढे धार्मिक सण-उत्सव हे डीजे व ध्वनिप्रदूषण मुक्त वातावरणात पारंपारिक वाद्यांच्या गजरात साजरे करण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवने यांनी केले.
केज शहरातून डिजे असणारे वाहन जात असताना पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक उमेश निकम यांनी सहकारी पोलिस कर्मचाऱ्यांनी शनिवारी कारवाई करून पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात डीजे न वाजविण्यासंबंधी वाहन मालक व चालकास समज दिली.
तसेच नियमांचे उल्लंघन झाल्यास माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कठोर कारवाई करण्याची देखील ताकीद दिली. या केज पोलिसांच्या डीजे विरोधातील कारवाईमुळे डीजे चालक धास्तावले आहेत. यापुढे सार्वजनिक सण-उत्सव साजरे करताना डीजे मुक्त व ध्वनी प्रदूषणमुक्त वातावरणात पारंपरिक वाद्याच्या साथीने साजरे करण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवने यांनी केले आहे.