आजच्या काळात शिक्षण फक्त ज्ञानापुरते मर्यादित राहिलेलं नाही, तर आज ते जीवनशैली आणि प्रतिष्ठेचे प्रतीकही बनलं आहे. आजच्या जगात अशा अनेक शाळा आहे ज्यांची फी खूप आहे, त्या महागड्याही आहेत. पण आज आपण अशा एका शाळेबद्दल जाणून घेणार आहोत ज्याची वार्षिक फी 1 कोटींपेक्षा जास्त आहे. अशा शाळेत नक्की काय शिकवतात, आणि एवढी फी घेण्यासारखं तिथे काय आहे, कोणत्या सुविधा आहेत, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना. चला जाणून घेऊया. स्वित्झर्लंडच्या रोले शहरात असलेली Institut Le Rosey हे जगातील सर्वात महागडे आणि प्रतिष्ठित बोर्डिंग स्कूल मानले जाते.
खरंतर या शाळेची स्थापना पॉल-एमिल कॉर्नेल यांनी 1880 साली केली होती. याला ‘स्कूल ऑफ किंग्ज’ असेही म्हणतात. शाळेच्या असाधारण इतिहासामुळे आणि प्रतिष्ठेमुळे, अनेक संस्थाने आणि देशांच्या राजघराण्यातील मुलांनी येथे शिक्षण घेतले आहे.
काय आहे वैशिष्ट्य ?
रिपोर्ट्सनुसार, स्वित्झर्लंडमधील या शाळेची वार्षिक फी सुमारे 1 कोटी 13 लाख, 73 हजार 789 रुपये इतकी आहे. म्हणजे वार्षिक फीच एक कोटीचा आकडा ओलांडते. विशेष म्हणजे या फीमध्ये निवास अर्थात राहण्याची सोय, जेवण, अभ्यास तसेच संगीत, खेळ, घोडेस्वारी यासारख्या अनेक अतिरिक्त ॲक्टिव्हिटीजचाही समावेश आहे.
या देशात जवळपास 60 देशांमधील एकूण 450 विद्यार्थी शिक्षण घेतात. तर त्यांना शिकवण्यासाठी जवळपास 120 शिक्षक शाळेने नियुक्त केले आहेत. म्हणजेच प्रत्येत 3 ते 4 विद्यार्थ्यांमागे 1 शिक्षक आहे.
Institut Le Rosey येथे मुलांना इंटरनॅशनल बॅकलॅरिएट (IB) आणि फ्रेंच बॅकलॅरिएट सारखे उत्कृष्ट अभ्यासक्रम मिळतात. आधुनिक क्लासरूम्स, भलमोठं क्रीडा संकुल, स्विमिंग पूल, टेनिस कोर्ट यासारख्या सुविधा उपलब्ध असून त्या विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक विकासात मदत करतात.
विशेष म्हणजे ही शाळा उन्हाळ्यात रोले शहरात भरते तर आणि हिवाळ्यात गस्टाड या रिसॉर्टमध्ये मुलांचे शिक्षण सुरू असते. गस्टाड कॅम्पस विशेषतः स्नोबोर्डिंग, स्कीइंग आणि आइस हॉकीसारख्या हिवाळी खेळांसाठी प्रसिद्ध आहे.
अतिशय महागडी फी असूनही या शाळेची संपूर्ण जगात स्वतःची वेगळी ओळख आहे. दरवर्षी फक्त काही निवडक विद्यार्थ्यांनाच येथे प्रवेश मिळतो, ज्यामुळे शिक्षणाचा स्तर खूप उच्च राहतो.