भारतीय संघ आशिया कप 2025 स्पर्धेसाठी युएईत दाखल झाला आहे. भारताचा पहिला सामना 10 सप्टेंबर रोजी युएईविरुद्ध असणार आहे. पण या स्पर्धेपूर्वी बीसीसीआय आणि ड्रीम इलेव्हन यांच्यातील जर्सी प्रायोजकत्व करार संपला होता. त्यामुळे भारतीय संघाच्या जर्सीवर कोणत्या कंपनीचं नाव असेल याची उत्सुकता क्रीडाप्रेमींना आहे. बीसीसीआयने नव्या प्रायोजकत्वासाठी निविदा देखील जारी केल्या होत्या. त्यामुळे ही उत्सुकता ताणली गेली होती. असं असताना आशिया कप स्पर्धेसाठी भारतीय संघाची नवी जर्सी लाँच केली आहे. मात्र या जर्सीवर कोणत्याही प्रायोजकाचं नाव नाही. त्यामुळे टीम इंडिया कोणत्याही प्रायोजकत्वाशिवाय आशिया कपमध्ये खेळणार हे स्पष्ट झालं आहे. ड्रीम 11 सोबतचा करार संपल्यानंतर टीम इंडियाच्या नव्या जर्सीचा पहिला लूक समोर आला आहे. नव्या जर्सीवर कोणत्याही प्रायोजकाचे नाव नाही.
जर्सीच्या डाव्या बाजूला बीसीसीआयचा लोगो आहे. तर उजव्या बाजूला डीपी वर्ल्ड आशिया कप 2025 असं लिहिलेलं आहे. डीपी वर्ल्ड हा आशिया कप 2025 चा प्रायोजक आहे. प्रायोजकाच्या मोकळ्या जागी आता इंडिया हे नाव लिहिलं आहे. त्यामुळे टीम इंडियाला नवा प्रायोजक हा आशिया कप स्पर्धेनंतर मिळेल हे आता स्पष्ट झालं आहे. बीसीसीआय आणि ड्रीम 11 यांच्यात 2023 मध्ये करार झाला होता. पण हा करार 6 महिन्याआधीच मोडला आहे. केंद्र सरकारने ऑनलाइन गेमिंग सुधारणा 2025 मध्ये सुधारणा केल्यानंतर ड्रीम 11 वर संकट आलं. त्यानंतर बीसीसीआयने नवा प्रायोजक शोधण्यास सुरुवात केली.
🚨 THE ASIA CUP JERSEY OF TEAM INDIA 🚨 🇮🇳 pic.twitter.com/UVuIHEu5C9
— Johns. (@CricCrazyJohns)
दरम्यान, भारताच्या किर्लोस्कर ग्रुप आणि जपानच्या टोयोटा मोटर कॉर्पोरेशन यांच्या संयुक्त उपक्रम असलेल्या टोयोटा किर्लोस्कर मोटरने टीम इंडियाचा मुख्य प्रायोजक बनण्यात रस दाखवल्याची चर्चा आहे. दुसरीकडे, बीसीसीआये जर्सी प्रायोजकासाठी 30 ते 40 लाख रुपयांची वाढ केली आहे. या माध्यमातून बीसीसीआयला 400 कोटी अधिक कमाई होऊ शकते. तीन वर्षांसाठी नवा प्रायोजकाला इतके पैसे मोजावे लागतील. यात 2026 टी20 वर्ल्डकप, 2027 वनडे वर्लडकप आणि 130 सामन्यांमधून 400 कोटींहून अधिक रक्कम मिळू शकते. बीसीसीआयने 16 सप्टेंबर रोजी टायटल स्पॉन्सरसाठी बोली लावण्याचे नियोजन केले आहे.