swt54.jpg व swt52.jpg
89689, 89687
कुडाळः शहरातील प्रभावळकरांच्या मोठ्या घरातील ( प्रभावळकर वाडा ) श्री गणेश बाजूला गौराई. दुसऱ्या छायाचित्रात गौरी पूजनाच्या दिवशी सर्व प्रभावळकर बंधू एकत्र बसून दोरे बांधतात. (छायाचित्रेः अजय सावंत)
‘प्रभावळकर वाडा’ जपतोय ५५० वर्षांची परंपरा
कुडाळातील रहिवाशीः गौरी पूजनानिमित्त दोरे बांधण्याची आगळी वेगळी प्रथा
अजय सावंतः सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ५ः गौरी पूजनाच्या दिवशी कुडाळ शहरातील प्रभावळकरांच्या मोठ्या घरात (प्रभावळकर वाडा) गेल्या तब्बल ५५० वर्षांपासून चालत आलेली आगळी वेगळी परंपरा आजही सुरू आहे. या दिवशी प्रभावळकर घराण्यातील सर्व बंधू एकत्र जमून विशेष दोरे बांधतात.
या दोऱ्यांमध्ये अविवाहित पुरुषांसाठी ८ गाठीचे तर विवाहित पुरुषांसाठी १६ गाठीचे दोरे बांधले जातात. या दोऱ्यांमध्ये हळद, खोबरे, सुपारी, कापड, रेशीम आणि विविध वनस्पतींची पाने यांचा समावेश असतो. हे सर्व दोरे नंतर गौराई देवीच्या खांद्यावर ठेवले जातात, ज्याद्वारे संपूर्ण घराण्याचा भार देवीकडे सोपवला जातो. या पूजेद्वारे प्रभावळकर बंधू आपल्या वंशविस्तार, सुखसमृद्धी आणि कल्याणासाठी प्रार्थना करतात.
इसवी सन १६६० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या कोकण स्वारीदरम्यान प्रभांवल्लीचे प्रभावळकर आपले राज्य सोडून कुडाळ येथे स्थायिक झाले. स्वराज्य कार्यासाठी त्यांनी आपले जीवन वाहून घेतले. छत्रपतींनी त्यांना जमीन, मानपानाचे अधिकार व सुभेदारी बहाल केली. नंतर इसवी सन १७६० मध्ये ऐतिहासिक प्रभावळकर वाडा बांधला गेला.
या राजघराण्याने पानिपतच्या युद्धातही सहभाग घेतला. तेव्हापासून आजपर्यंत ही परंपरा सातत्याने पाळली जाते. यावर्षीच्या परंपरेत शिवराम सावंत प्रभावळकर, केशव सावंत प्रभावळकर, प्रकाश सावंत प्रभावळकर, गणेश सावंत प्रभावळकर, संग्राम सावंत प्रभावळकर, मंदार सावंत प्रभावळकर, प्रसन्ना सावंत प्रभावळकर, संदेश सावंत प्रभावळकर, अनंत सावंत प्रभावळकर, गिरीश सावंत प्रभावळकर, नितीन सावंत प्रभावळकर आणि मकरंद सावंत प्रभावळकर उपस्थित होते.