लोकप्रिय कॉमेडियन जाकिर खानने स्टेज शोपासून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. जाकिरने खुलासा केला की गेल्या वर्षभरापासून त्याची प्रकृती बिघडलेली आहे. कामाच्या व्यग्र वेळापत्रकामुळे यापुढे आरोग्याकडे अधिक दुर्लक्ष होण्यापेक्षा त्याने ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. आरोग्याकडे लक्ष देण्यास खूप उशीर होण्यापूर्वी त्याने वेळीच त्याकडे लक्ष देण्याचा विचार केला आहे. जाकिरने सोशल मीडियावर याबद्दलची माहिती दिली आहे.
जाकिर खानची पोस्ट-‘मी गेल्या दहा वर्षांपासून टूर करतोय. तुमचं प्रेम आणि आपुलकी मिळवण्याबाबत मी स्वत:ला अत्यंत नशिबवान समजतो. परंतु अशा प्रकारची थकवणारी टूरिंगसाठी आरोग्यासाठी चांगली नाही. भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं समाधान करणं, दिवसातून दोन ते तीन शोज करणं, रात्रभर जागं राहणं, पहाटेच्या फ्लाइटने प्रवास करणं. जवळपास वर्षभरापासून मी आजारीच आहे. तरीसुद्धा काम करावं लागलं, कारण त्यावेळी ते करणं गरजेचं होतं. ज्यांना माहीत आहे, त्यांना माहीत आहे’, असं त्याने लिहिलं.
या पोस्टमध्ये त्याने पुढे म्हटलंय, ‘मला स्टेजवर परफॉर्म करणं आवडतं. पण आता मला ब्रेक घ्यावा लागतोय. मला हे करायचं नाही, पण गेल्या वर्षभरापासून मी त्याकडे दुर्लक्ष करत होतो. पण आता मला वाटतंय की गोष्टी हाताबाहेर जाण्यापूर्वी मी ते हाताळलं पाहिजे. त्यामुळे यापुढे आम्ही भारतातील मर्यादित शहरांमध्येच दौरा करू. मी जास्त शोज करू शकणार नाही. यानंतर मला दीर्घ ब्रेकवर जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.’
जाकिरने पुढच्या पोस्टमध्ये त्याच्या आगामी दौऱ्याविषयीची माहिती दिली. त्याचा ‘पापा यार’ हा शो येत्या 24 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. हा दौरा पुढच्या वर्षी 11 जानेवारीपर्यंत सुरू राहील. वडोदरा, अहमदाबाद, दिल्ली, बंगळुरू, कोलकाता, भोपाळ, उदयपूर, जोधपूर अशा विविध शहरांमध्ये तो परफॉर्म करेल.