गणरायाचे भक्तिसागरात विसर्जन
मिरवणुका, गुलालाची उधळण; पावसाच्या हजेरीत ढोल-ताशांचा गजर, रविवारच्या सकाळपर्यंत निरोप लांबला
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ७ : ‘मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ असा जयघोष करत निघालेल्या भव्य मिरवणुका, गुलालाची, फुलांची उधळण, ढोल-ताशांच्या गजरात थिरकणारी पावले आणि रिमझिम पावसाची हजेरी, अशा उत्साहपूर्ण आणि भक्तिसागराने न्हाऊन निघालेल्या वातावरणात लाडक्या गणरायाचे विसर्जन करण्यात आले. ठाणे महापालिका प्रशासन आणि पोलिसांच्या यशस्वी नियोजनामुळे गणेशमूर्ती मिरवणूक आणि नऊ हजार ८६१ मूर्तींचे विसर्जन निर्विघ्न पार पडले; मात्र मिवणुका उशिरा सुरू झाल्याने मोठ्या गणेश मंडळांच्या गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी रविवारची पहाट उजाडली. सकाळी ८ वाजेपर्यंत सर्व घाटांवर विसर्जन सुरू होते.
१० दिवसांचा पाहुणचार घेतल्यानंतर शनिवारी अनंत चतुर्दशीला गणराय आपल्या गावी जाण्यासाठी निघाले. त्यांचा हा प्रवास वाजत-गाजत घडावा, यासाठी ठाण्यात ठिकठिकाणी भव्य आजोजन केले होते; मात्र सकाळपासूनच पावसाचा जोर असल्यामुळे मिरवणुकीच्या उत्साहावर पाणी फेरले जाईल, असा अंदाज बांधण्यात येत होता, पण पावसाच्या हजेरीने हा उत्साह आणखी द्विगुणीत झाल्याचे पाहायला मिळाले. पावसामुळे सायंकाळी ५ नंतर मिवणुकांना सुरुवात झाली. घरगुती गणपती कार, रिक्षांमधून, तर मंडळांचे गणपती ट्रक, ट्रॉलीमधून पुढच्या प्रवासासाठी निघाले. ढोल-ताशा, लेझीम पथकांसह मिरवणुका काढण्यात आल्या. काही मंडळांनी पारंपरिक वाद्य आणि बँजो पथकासह मिरवणुका काढल्याचे दिसून आले. या वेळी छत्रपती संभाजी महाराजांचे जीवनचित्र उलगडून सांगणारी मिरवणूक लक्षणीय ठरली.
उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट
गणपतींचे विसर्जन निर्विघ्न पार पडावे यासाठी शहरातील प्रत्येक ठिकाणी पोलिस प्रशासन, ठाणे पालिकेचे आपत्ती व्यवस्थापन पथक, स्वयंसेवक आणि राजकीय मंडळींचे कार्यकर्ते सज्ज होते. ठाण्याच्या गायमुख, कळवा पारसिक खाडीसह सर्व विसर्जन घाटांवर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पालिकेचे सर्व प्रमुख अधिकारी स्वतः या सर्व यंत्रणेवर लक्ष ठेवून होते. दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही रात्री विसर्जन घाटांना भेट देत भाविकांचा उत्साह वाढवला. तसेच सर्व यंत्रणेची पाहणी केली.
खाडीत विसर्जन घटले
अकराव्या दिवशी झालेल्या विसर्जनात कृत्रिम तलावांतील मूर्ती विसर्जनाचे प्रमाण गतवर्षीपेक्षा ६७ टक्क्यांनी वाढले, तर खाडीत थेट विसर्जन होणाऱ्या मूर्तींच्या प्रमाणात गतवर्षीच्या तुलनेत ४१ टक्क्यांनी घट झाली. त्याचबरोबर, विशेष टाकी व्यवस्था (हौद) यातील विसर्जनाचे प्रमाण यंदा ३८ टक्क्यांनी वाढले असल्याची माहिती मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी दिली आहे. दरम्यान, गणेशमूर्ती स्वीकार केंद्रामध्ये प्राप्त झालेल्या एकूण ७६ गणेशमूर्तींचे महापालिकेच्या वतीने विधिवत विसर्जन करण्यात आले. तसेच, फिरत्या विसर्जन केंद्रात ५२ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.
पाच हजार शेवगा रोपांचे वाटप
उपमुख्यमंत्री हरित अभियानात ठाणे महापालिका क्षेत्रात वृक्षारोपणाचा संकल्प करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने, सलग दुसऱ्या वर्षी, गणेश विसर्जनासाठी करिता येणाऱ्या नागरिकांना शेवगा वृक्षांची मोफत रोपे वाटण्यात आली. रेतीबंदर व इतर विसर्जन घाट येथे एकूण पाच हजार शेवगा रोपांचे वाटप करण्यात आले. उपायुक्त मधुकर बोडके आणि उद्यान निरीक्षक केदार पाटील यांनी या अभियानाचे संयोजन केले.
रविवारी सकाळपर्यंत विसर्जन
मोठ्या मंडळांची विसर्जन मिरवणूक उशिरा सुरू झाल्याने, रविवार (८ सप्टेंबर) सकाळी ८ वाजेपर्यंत विसर्जन सुरू होते. एकूण ९,८६१ गणेशमूर्तींचे विसर्जन ठाणे शहरातील विविध घाटांवर झाले.
अनंत चतुर्दशी विसर्जनाची आकडेवारी
विसर्जनस्थळ संख्या गणेशमूर्ती गतवर्षीची संख्या
कृत्रिम तलाव २४ ६६९९ ३९९४
विशेष हौद ) व्यवस्था ७७ १४७९ ६२१
खाडी विसर्जन घाट ०९ १५५५ ३७६४
फिरती विसर्जन व्यवस्था १५ ५२ २०
मूर्ती स्वीकृती केंद्र १० ७६ २०
एकूण - ९८६१ ८४१९
मूर्तींचा प्रकार
पीओपी मूर्ती : ५३९०
शाडू मूर्ती : ४४७१
मोठ्या (सहा फुटांपेक्षा जास्त) पीओपी मूर्ती : १८८
मोठ्या शाडू मूर्ती : ३२२
सार्वजनिक गणपती मंडळ मूर्ती : ३७२