Maharashtra Weather : गणरायाला निरोप देण्यासाठी पावसाचे आगमन, पालघरसह नाशिकला ऑरेंज अलर्ट, कुठे कसा असणार पाऊस, वाचा
Saam TV September 07, 2025 01:45 PM
  • पालघर आणि नाशिक घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट, मुसळधार पावसाची शक्यता.

  • मुंबई, रायगड, पुणे आणि इतर जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी.

  • माथेरान, अंबरनाथ आणि वसईत मुसळधार पावसाची नोंद.

  • हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले.

गणरायाला निरोप देण्यासाठी महाराष्ट्रात पुन्हा पावसाचे आगमन झाले आहे. आज सकाळपासूनच मुंबई आणि उपनगरांत पावसाची रिमझिम पाहायला मिळाली. हवामान विभागाने पालघर आणि नाशिक जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर आज जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. यामुळे या भागांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. राज्याच्या इतर भागांमध्येही हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरींचा अंदाज असून, अनेक जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट देण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून कमी दाब क्षेत्र निर्माण झाल्यामुळे वातावरणात पावसाला पोषक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि घाटमाथ्यावर पावसाच्या सरी कोसळत आहेत. शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत रायगड जिल्ह्यातील माथेरान येथे तब्बल १२० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तर ठाण्यातील अंबरनाथ आणि पालघरमधील वसई येथे प्रत्येकी १०० मिलीमीटर पाऊस पडला.

Maharashtra Weather : पुण्यासह काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; कोकण, मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज पालघर आणि नाशिक जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, रायगड, नंदूरबार आणि पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावरही आज जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याशिवाय छत्रपती संभाजीनगर, जालना, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा येलो अलर्ट दिला आहे.

Weather Update : अकोल्याला पावसाचा फटका, नागरिकांना पाण्याने वेढले; पाच जणांचा थरारक रेस्क्यू

दरम्यान, ब्रह्मपुरी येथे काल ३३.३ अंश सेल्सिअस इतके उच्चांकी तापमान नोंदले गेले. काही भागांत ढगाळ वातावरणासह हलक्या सरी सुरू आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, उर्वरित महाराष्ट्रात पुढील काही दिवस हलक्या सरी पडत राहतील, तर काही भागात सूर्यप्रकाशाची उघडीपही दिसेल.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.