जंगलात फिरत असलेल्या वाघाला एक प्राणी पाहून ही शिकार सोपी आहे असं वाटलं. त्याच्यासमोर एक मादी अस्वल आणि तिचं पिलू होतं.
अस्वल पिलासह एका सफारी लॉजजवळ असलेल्या पाणवठ्यापासून जात होतं. वाघ झाडीत दबा धरून होता.
वाघ लपून त्यांचा पाठलाग करत त्यांच्यावर हल्ला करण्याची तयारी करत होता. मात्र त्यावेळी तिथं अनपेक्षितपणे असं काही घडतं.
वाघ हल्ला करत असल्यामुळं घाबरून पळून जाण्याऐवजी त्या अस्वलानं वाघावर अचानक हल्ला चढवला.
वाघानंही प्रतिहल्ला केला आणि सुरू झाली 45 मिनिटांची लढाई. वाघ आणि अस्वल एकमेकांवर तुटून पडले, दात आणि पंजानं एकमेकांना जखमी करू लागले.
जगातील सर्वात धोकादायक अस्वलहे अस्वल भारतात आढळतं. त्याला स्लॉथ बिअर किंवा भारतीय अस्वल म्हणतात. हे अस्वल जगातील सर्वात धोकादायक अस्वल मानलं जातं.
भारतात जंगलाचं क्षेत्र कमी होत चालल्यामुळं या अस्वलांचा नैसर्गिक अधिवास कमी होत चालला आहे.
अशावेळी ही अस्वलं जंगलात राहणाऱ्या मानवी समुदायांबरोबर ताळमेळ घालत वास्तव्य करण्याचे नवे मार्ग शोधत आहेत.
स्लॉथ अस्वलांचं नाव त्यांच्या लांब पंजांमुळे आणि दातांमुळे पडलं. कारण ते स्लॉथ प्राण्यासारखे असतात.
स्लॉथ अस्वलं भारत, नेपाळ आणि श्रीलंकेत सापडतात. भारतीय उपखंडातील सर्वाधिक आक्रमक प्राण्यांमध्ये त्यांचा समावेश होतो.
या अस्वलांना जेव्हा एखाद्या गोष्टीविषयी धोका वाटतो, मग तो माणूस असो की वाघ, ते लगेचच आणि वेगानं हल्ला चढवू शकतात.
1950 ते 2019 दरम्यान जगभरात मोठ्या मांसाहारी प्राण्यांनी माणसावर केलेल्या हल्ल्यांचा अभ्यास केल्यावर असं आढळलं की, सर्वाधिक हल्ले स्लॉथ अस्वलांनी केले आहेत.
हल्लेखोर प्राण्यांमध्ये वाघ, सिंह, लांडगे आणि इतर अस्वलांचाही समावेश होता.
या दरम्यान अस्वलांनी 1337 माणसांवर हल्ले केल्याची नोंद झाली. वाघांनी 1047, लांडग्यांनी 414 आणि ध्रुवीय अस्वलांनी 23 हल्ले केल्याची नोंद झाली आहे.
अर्थात, वाघ, सिंह आणि मार्जार कुळातील इतर मोठ्या प्राण्यांनी केलेले हल्ले अधिक घातक असतात. यातील जवळपास 65 टक्के प्रकरणांमध्ये माणसांचा मृत्यू होतो. अस्वलांनी (स्लॉथ अस्वल) केलेल्या हल्ल्यांच्या बाबतीत हे प्रमाण जवळपास 8 टक्के आहे.
मात्र, या अस्वलांनाही अनेक धोक्यांना तोंड द्यावं लागत आहे. यात त्यांचे नैसर्गिक अधिवास कमी होत जाणं आणि माणसांकडून त्यांच्यावर हल्ले करणं या गोष्टींचा समावेश आहे.
या अस्वलांची संख्या सातत्यानं घटते आहे. त्यांचा समावेश नामशेष होण्याचा धोका असलेल्या प्राण्यांच्या श्रेणीत होऊ शकतो.
संपूर्ण जगभरात त्यांची संख्या 20 हजारांपेक्षाही कमी राहिली असेल.
ही समस्या फक्त अस्वलांची नाही. ही अस्वलं आपल्या पर्यावरणीय परिसंस्थेत महत्त्वाची भूमिका बजावतात. ते फळांच्या बीजरोपणाला मदत करतात आणि वाळवीच्या संख्येवर नियंत्रण ठेवतात.
संशोधनातून समोर आलं आहे की, या अस्लवांचं वर्तन समजून घेणं माणसं आणि हे प्राणी या दोघांच्याही सुरक्षेत उपयुक्त ठरू शकतं. विशेषतः ही अस्वलं एखाद्या धोक्याला कशाप्रकारे प्रतिक्रिया देतात, हे समजणं फायदेशीर ठरू शकतं.
आक्रमकपणे लढण्याचं कौशल्यया अस्वलांचा आक्रमकपणा आश्चर्यचकित करणारा असतो. कारण त्यांच्या आहारात प्रामुख्यानं फळं, वाळवी आणि मुंग्यांचा समावेश असतो. ते सस्तन प्राण्यांची शिकार करत नाही.
मात्र 2024 मध्ये झालेल्या एका अभ्यासानुसार अस्वलांच्या या प्रजातीनं बहुधा वाघांसारख्या मांसाहारी शिकारी प्राण्यांपासून बचाव करण्यासाठी ही आक्रमक शैली आणि डावपेच विकसित केले आहेत.
अभ्यास करणाऱ्या संशोधकांच्या मते, "एखाद्या संभाव्य धोक्याकडे वेगानं पळत जाऊन हल्ला चढवणं, या अस्वलांसाठी हजारो किंबहुना लाखो वर्षांपासून उपयुक्त ठरलं आहे."
संशोधकांनी अस्वलाची ही प्रजाती आणि वाघांमध्ये झालेल्या 43 लढायांचं विश्लेषण केलं आहे.
त्यात त्यांना आढळलं की, अस्वलांचे हे डावपेच प्रभावी असतात. बहुतांश वेळा दोन्ही बाजू माघार घेतात आणि वाघ जवळपास सुरक्षितपणे पळ काढतो.
सफारी लॉजजवळ झालेल्या या चकमकीत देखील, ताकदीचा विचार करता ते अस्वल आणि नर वाघ बऱ्याच अंशी एकमेकांचे स्पर्धक ठरले. ज्या नॅचरलिस्टनं ही झडप किंवा लढाई पाहिली होती, त्याचं हेच म्हणणं होतं.
महाराष्ट्रातील ताडोबा नॅशनल पार्कमधील बाम्बू फॉरेस्ट सफारी लॉजचे मुख्य नॅचरलिस्ट आणि व्यवस्थापक अक्षय कुमार यांनी या घटनेचा व्हीडिओ रेकॉर्ड केला होता.
त्यांचं म्हणणं आहे, "वाघ खूप शक्तिशाली असतात, मात्र दीर्घकाळ लढण्याच्या बाबतीत ते तितके मजबूत नसतात. अस्वलाचं शरीर खूपच केसाळ असतं. त्यामुळे वाघाला त्याच्या गळ्यावर नीट पकड घेता आली नाही."
शेवटी-शेवटी तर नर वाघ पूर्णपणे थकला होता.
अक्षय कुमार सांगतात की, "तो वाघ एका तळ्यावर आला. अतिशय थकलेला असा हा वाघ तिथे दोन तास बसून राहिला. मादी अस्वल मात्र तिथून निघून गेलं."
पुढील काही दिवसांमध्ये त्यांनी तो वाघ आणि अस्वलाला एकमेकांसमोर आलेलं पाहिलं नाही. दोघंही वेगवेगळे फिरत होते. मात्र ते ठीक दिसत होते.
मात्र, माणसांवर जर अशा प्रकारचा हल्ला झाला तर तो धोकादायक ठरू शकतो. कारण वाघ ज्याप्रमाणे अस्वलांपेक्षा वेगानं पळू शकतो, तसं माणसं पळू शकत नाहीत.
अस्वलांनी केलेले हल्ले माणसांसाठी अत्यंत धोकादायक ठरू शकतात. कारण बहुतांश वेळा अस्वलं डोक्यावर हल्ला चढवतात. त्यांचे मोठे आणि धारदार पंजे माणसांचा चेहरा फाडू शकतात आणि डोळे बाहेर काढू शकतात.
निशिथ धरैया, जुनागडमधी बीकेएनएम विद्यापीठातील सेंटर फॉर वाईल्डलाईफ रिसर्चचे संचालक आहेत. ते म्हणतात, "माणूस आणि अस्वलामधील संघर्षाची अनेक प्रकरणं आहेत. बहुतांश वेळा स्लॉथ अस्वलं माणसांवर हल्ला करतात."
धरैया म्हणतात की, प्रतिहल्ल्यांमध्ये ही अस्वलं मारली जाण्याचा देखील धोका असतो.
अस्वलं आणि माणसांमध्ये होणाऱ्या चकमकींमध्ये वाढ होते आहे. अस्वलांचा नैसर्गिक अधिवास घटत चालल्यामुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे.
धरैया यांच्या मते, या चकमकी किंवा संघर्ष टाळले जाऊ शकतात. ही अस्वलं कशाप्रकारे, का आणि कधी हल्ला करतात, हे समजून घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर हे शक्य होऊ शकतं.
अस्वलं गैरसमजाचे बळी आहेत का?धरैया म्हणतात की अस्वलं मुळातच आक्रमक स्वभावाची असतात किंवा त्यांचा हेतू माणसांना मारण्याचा असतो, असं नाही.
ती माणसांसाठी धोकादायक मानले जातात, कारण हा त्यांच्या बचावतंत्राचा भाग आहे. त्यांच्या या तंत्राचा उद्देश शत्रूला घाबरवून पळवून लावण्याचा असतो.
उदाहरणार्थ - जेव्हा अस्वलाच्या मादीला वाटतं की, तिच्या पिल्लांना धोका आहे, तेव्हा ती तिच्या शत्रूपेक्षा मोठं दिसण्याचा प्रयत्न करते. मग तो शत्रू वाघ असो, बिबट्या असो, लांडगा असो की माणूस असो.
ते म्हणतात, "अशा परिस्थितीत अस्वल मादी तिच्या मागच्या पायांवर उभी राहते आणि मग पुढच्या पायांनी हल्ला करते. या पायांना लांब नखं असतात. या नखांचा उपयोग मुंग्यांसारखं अन्न शोधण्याच्या नेहमीच्या कामातही होतो."
वाघांबरोबर संघर्षाच्या वेळी उभं राहिल्यामुळे अस्वलांना निर्णायक आघाडी मिळू शकते. वाघ आणि अस्वलामधील लढायांच्या व्हीडिओचं विश्लेषण करणाऱ्या एका अभ्यासात आढळून आलं की वाघ जवळ आल्यानंतर जवळपास सर्व स्लॉथ अस्वलं उभी राहिली होती. यात एकमेव स्लॉथ अस्वल उभं राहिलं नव्हतं आणि ते मारलं गेलं.
त्याच्या उलट या संघर्षांमध्ये कोणताही वाघ गंभीररित्या जखमी झाला नाही किंवा मारला गेला नाही. यामागचं कारण बहुधा वाघ हे स्लॉथ अस्वलांपेक्षा वेगवान असतात आणि ते पळून दूर जाऊ शकतात.
मात्र, स्लॉथ अस्वलापासून पळून बचाव करणं सर्वसामान्यपणे माणसांना शक्य नाही.
माणसांचा पळण्याचा वेग वाघांपेक्षा खूपच कमी असतो इतकंच नाही तर अस्वलांच्या हल्ल्यातून बचावलेल्या लोकांच्या नोंदींमधून माहिती मिळते की, स्लॉथ अस्वलं कधीकधी अचानक न पाहताच माणसांच्या दिशेनं पळू लागतात.
धरैया म्हणतात, "जर उभ्या राहिलेल्या अस्वलानं एखाद्या व्यक्तीला पंजा मारला, तर तो थेट माणसाच्या चेहऱ्यावर लागतो. चेहरा हा आपल्या शरीराचा सर्वात संवेदनशील भाग आहे."
ते म्हणतात, "याच कारणामुळे स्लॉथ अस्वलाचे हल्ले धोकादायक असतात. अस्वलाच्या प्रजातीत ती आक्रमक अस्वलं म्हणून ओळखली जातात. प्रत्यक्षात ती इतर अस्वलांपेक्षा जास्त आक्रमक नसतात. मात्र त्यांची हल्ला करण्याची पद्धत अधिक धोकादायक असते."
अशा धोकादायक हल्ल्यांचा परिणाम भयानक होऊ शकतो. तुम्हाला आयुष्यभरासाठीची दुखापत होऊ शकते.
2020 मध्ये श्रीलंकेत 50 वर्षांचा एक माणूस जंगलात चिंचा शोधत होता. त्याचवेळेस स्लॉथ अस्लवानं त्याच्यावर हल्ला चढवला आणि त्याच्या चेहऱ्याची कातडी फाडून टाकली.
याच प्रकारे 2023 मध्ये श्रीलंकेत 43 वर्षांच्या एका गुराख्याचा चेहरा देखील स्लॉथ अस्वलानं अतिशय भयानकरित्या ओरबडलं. दोन्ही प्रकरणांमध्ये जखमी झालेल्या व्यक्ती आंधळ्या झाल्या.
ओडिशामधील 2017 च्या एका अहवालानुसार, एका व्यक्तीनं स्लॉथ अस्वलावर इतका भयानक हल्ला केला की त्याच्या मेंदूचा एक भाग बाहेर निघून आला.
अशा हल्ल्यातून बचावलेल्या लोकांचं म्हणणं होतं की, त्यांना काही करण्याची संधीच मिळाली नाही.
आणखी एका व्यक्तीनं सांगितलं की, "हा हल्ला इतका पटकन झाला की अस्वल येताना मला दिसलंच नाही. फक्त धूळ उडताना, पानं उडताना दिसली आणि अस्वलाचं गुरगुरणं आणि ओरडणं ऐकू येत होतं."
माणूस आणि अस्वलाचा संघर्ष केव्हा होतो?धरैया आणि त्यांची टीम मध्य गुजरातच्या भागांमध्ये अभ्यास करते आहे. तिथल्या आदिवासी समुदायासमोर अशाप्रकारे अस्वलांशी होणाऱ्या संघर्षाचा धोका कायम असतो.
ते म्हणतात, "यातील बहुतांश लोक जंगलात राहतात. ते जंगलात लाकूड, इमारतीसाठी लागणारं लाकूड, फळं, मध आणि औषधी वनस्पती गोळा करण्यासाठी जातात. या दरम्यान त्यांचा सामना अशा अस्वलांशी होतो जे या औषधी वनस्पती आणि मधावर अवलंबून असतात."
विशेषतः गावकरी जंगलात मोहाची फूलं वेचण्यासाठी जातात. त्यापासून ते एक पारंपारिक दारू बनवतात.
धरैया म्हणतात, "त्यांनी ही फुलं पहाटेच गोळा करायची असतात. त्याच वेळेस स्लॉथ अस्वलं अन्नाच्या शोधात असतात. ही फुलं स्लॉथ अस्वलांच्या अन्नाचादेखील भाग आहेत."
"त्यामुळे ते देखील या भागात येतात. पहाटेच्या वेळेस उजेड अपुरा असतो, त्यामुळे माणूस आणि अस्वलांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता वाढते."
मध्य गुजरातमधील या वस्त्यांमध्ये एक सर्वेक्षण करण्यात आलं होतं. त्यातील बहुतांश लोकांना सांगितलं होतं की, स्लॉथ अस्वलं माणसासाठी गंभीर धोका आहेत.
याच कारणामुळे अस्वलांचं संरक्षण करण्यासाठी या लोकांचा खूप कमी पाठिंबा आहे.
धरैया आणि त्यांचे सहकारी, डब्ल्यूसीबी रिसर्च फाऊंडेशनमध्ये हाच विचार बदलण्याचा प्रयत्न करत आहेत.
ते हल्ल्यांचं विश्लेषण करतात आणि बचावलेल्या लोकांच्या मुलाखती घेऊन त्यामागचं कारण समजून घेण्याचा प्रयत्न करतात.
मग त्यांच्या माहितीचा वापर करून स्थानिक लोकांना अस्वलापासून वाचवण्यासाठी मदत करतात.
या उपायांमध्ये स्थानिक लोकांना अस्वलापासून संरक्षण कसं करायचं याची माहिती दिली जाते. उदाहरणार्थ - चालताना गोंगाट करणं, जेणेकरून अचानक अस्वलाशी संघर्ष होण्याची शक्यता कमी होईल.
अस्वल आणि माणसांना एकमेकांना सहजपणे पाहता यावं आणि बचाव करता यावा यासाठी शेतांच्या काठावर आणि रस्त्याजवळ असलेली दाट झाडी आणि वृक्ष साफ करण्याचा सल्लादेखील तज्ज्ञ देतात.
त्याचबरोबर, लोकांना एकट्यानं जंगलात कमी वेळा जायची वेळ यावी यासाठी ते वस्त्यांच्या जवळच शौचालयं बनवण्याचा सल्लादेखील देतात.
अस्वलांना पळवून लावणारी 'घंटी काठी'संशोधकांनी एका विशेष 'अँटी स्लॉथ बिअर स्टिक' देखील बनवली आहे. या काठीला घंट्या आणि थोडे कमी टोकदार काटे लावलेले असतात.
याला 'घंटी काठी' म्हणतात. धरैया सांगतात की, या काठीचा उद्देश अस्वलांना घाबरवण्याचा आणि संघर्ष टाळण्याचा आहे.
ते म्हणतात की, त्यांनी आणि त्यांच्या टीमनं अशा 500 काठ्या आदिवासी समुदायांमध्ये आणि स्लॉथ अस्वलं राहत असलेल्या स्थानिक जंगलात वन विभागाचे जे कर्मचारी गस्त घालतात त्यांना वाटल्या आहेत.
धरैया सांगतात, "लोकांचं म्हणणं आहे की ही काठी फक्त अस्वलांनाच नाही तर रानडुकरं आणि बिबट्यासारख्या इतर प्राण्यांना दूर ठेवण्यात देखील उपयुक्त असते. या काठीला ते घाबरतात."
त्यांना आशा आहे की, स्लॉथ अस्वलाच्या उपस्थित सुरक्षितपणे कसं राहायचं हे एकदा कळल्यानंतर लोक याला संवर्धन करता येऊ शकणारा प्राणी मानू लागतील.
या अस्वलांवर जे सर्वेक्षण करण्यात आलं, त्यात आढळून आलं की यांच्याबद्दल वन विभागाच्या फील्ड स्टाफचं मत सर्वसामान्य गावकऱ्यांच्या तुलनेत अधिक सकारात्मक होतं.
धरैया म्हणतात, "स्लॉथ अस्वल भारतीय उपखंडातील प्राणी आहे. त्यामुळे त्याचं संवर्धन करणं ही आपली जबाबदारी आहे. स्लॉथ अस्वल जंगलाचे इंजिनीअर आहेत.
ते मुंग्या आणि वाळवीच्या लोकसंख्येवर नियंत्रण ठेवतात, बिया पसरवतात आणि जमिनीची सुपीकता वाढवण्यास मदत करतात."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)