Vijay Mallya-Nirav Modi Extradition : भारत गेल्या काही वर्षांपासून आर्थिक फसवणूक करून देशबाहेर पलायन केलेल्या बड्या धेंडांना परत आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. विजय माल्ल्या आणि नीरव मोदी या हायप्रोफाईल आरोपींना लवकरच भारतात आणण्यात येणार आहे. सध्या या आरोपींवरील प्रकरणं ब्रिटेन कोर्टात प्रलंबित आहेत. आता त्यासाठीच्या हालचाली तेजीत आहेत. ब्रिटेनच्या काऊन प्रॉसिक्य़ूशन सर्व्हिसचे (CPS) एक पथक भारतात आले. त्याने तिहार तुरुंगाची पाहणी केली. त्यांनी तिथल्या सोयी-सुविधांचा, सुरक्षेचा अंदाज घेतला. या टीमचा हा भारत दौरा महत्त्वपूर्ण मानण्यात येत आहे.
तिहार तुरुंगाचा दौरा महत्त्वाचा
CPS टीमने तुरुंगातील सोयी-सुविधांची बारकाईने पाहणी केली. भारत प्रत्यार्पित कैद्यांना सुरक्षित वातावरण आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या सोयी-सुविधा देतो, हे ब्रिटिश कोर्टाला पटवून देण्यासाठी हा दौरा महत्वपूर्ण मानण्यात येत आहे. भारतीय अधिकाऱ्यांनी सांगितले की, जर गरज पडली तर अशा हायप्रोफाईल कैद्यांना एक खास एनक्लेव, व्यवस्था तयार करून देण्यात येईल.
चार सदस्यांच्या या पथकात दोन CPS तज्ज्ञ आणि ब्रिटिश उच्चायुक्त कार्यालयाचे दोन अधिकारी यांचा समावेश होता. त्यांनी अत्यंत सुरक्षित आणि संवेदनशील वॉर्डची पाहणी केली. त्यांनी तिथल्या काही कैद्यांशी चर्चा केली. त्यानंतर तुरुंग प्रशासन आणि भारतीय अधिकाऱ्यांसोबत बैठक केली. त्यांनी प्रत्यार्पणाविषयीची प्रक्रिया, कागदपत्रे आणि इतर मुद्यावर मनमोकळी चर्चा केली.
तिहार तुरुंगाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
आपल्याला भारताकडे सोपविण्यात येऊ नये अशी विनंती विजय माल्ल्या आणि नीरव मोदी यांनी ब्रिटिश न्यायालयाकडे केली होती. भारतातील तिहार तुरुंगात हिंसा आणि असुरक्षेची भीती आहे, असा युक्तीवाद त्यांनी केला होता. याच युक्तीवादावर फेब्रुवारी महिन्यात शस्त्र तस्कर संजय भंडारी यांचे प्रत्यार्पण रद्द करण्यात आले होते. तोच आधार घेत माल्ल्या आणि मोदी प्रत्यार्पणाला विरोध करत होते. त्यामुळे ब्रिटिश अधिकाऱ्यांचा तिहार तुरुंगाचा दौरा महत्त्वपूर्ण ठरला आहे.
या घटनेनंतर CPS ने भारत सरकारकडे युरोपियन मानवाधिकार करारातंर्गत (ECHR) सुरक्षेसाठी हमी मागितली आहे. भारताने त्यावर प्रत्यर्पित आरोपींना देशातील तुरुंगात कोणत्याही प्रकारचा त्रास अथवा त्यांच्या सुरक्षेला धोका नसेल असे आश्वासन दिले आहे.