गणेशोत्सवाचा दहा दिवसांचा आनंदोत्सव संपल्यानंतर आता सर्व मुंबईकर आपल्या लाडक्या बाप्पााला निरोप देण्यासाठी सज्ज झाले आहेत. भक्तीमय वातावरणात आणि साश्रू नयनांनी गणपती बाप्पााला निरोप दिला जात आहे. नवसाला पावणारा राजा अशी ओळख असलेल्या लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. या विसर्जन मिरवणुकीत अनेक लोक सहभागी होत असतात. ज्यांना मंडपात जाऊन लालबागच्या राजाचं दर्शन घेता आलं नाही, त्यांच्यासाठी विसर्जनाचा दिवस एक मोठी संधी घेऊन येतो. अनंत चतुर्दशीच्या दिवशी लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक काढली जाते. आता नुकतंच भाविकांच्या सोयीसाठी यंदाच्या विसर्जन मिरवणुकीचा मार्ग आणि वेळ जाहीर करण्यात आला आहे.
जर यंदा तुमचेही दर्शन राहिले असेल तर तुम्ही सोयीनुसार विसर्जन मिरवणुकीत सहभागी होऊ शकता. लालबागच्या राजाचा विसर्जनाच्या मिरवणुकीचा मार्ग जाहीर करण्यात आला आहे. यामुळे तुम्हाला कुठे आणि कधी बाप्पाचं दर्शन घेता येईल, हे आधीच कळेल. तुम्ही ठरलेल्या वेळेनुसार मिरवणुकीच्या मार्गावर जाऊन तुमच्या राजाला निरोप देऊ शकता. लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक शुक्रवार ६ सप्टेंबर रोजी दुपारी १२ च्या आसपास सुरु करण्यात आली. यावेळी मंडळाच्या प्रांगणातून ढोल-ताशांचा गजरात गुलालाची उधळण करत लाखो भक्त राजाला निरोप देत आहे. यावेळी सभामंडपात दर्शन घेता न आलेल्या भक्तांनी शाही मिरवणुकीत सामील होऊन आपल्या राजाच्या अंतिम दर्शनाचा आनंद घेता येणार आहे.
भव्य मिरवणुकीचा मार्गलालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक ही एक सोहळा नसून, भक्तांसाठी एक आध्यात्मिक यात्रा आहे. यातील प्रत्येक टप्पा फार महत्त्वाचा असतो.
चिंचपोकळी पूल : मिरवणुकीची सुरुवात झाल्यावर लालबाचगचा राजा दुपारी १ ते २ च्या दरम्यान चिंचपोकळी रेल्वे पुलावर पोहोचेल. या ठिकाणी पुलाच्या वर आणि खाली दोन्ही बाजूंनी राजाच्या दर्शनासाठी अलोट गर्दी जमली आहे.
भायखळा स्टेशन : चिंचपोकळीवरून पुढे दुपारी ३ ते ५ या वेळेत मिरवणूक भायखळा स्टेशनच्या दिशेने पुढे जाईल. या संपूर्ण मार्गावर रंगीबेरंगी पेपर ब्लास्ट आणि ढोल-ताशांचा आवाज पाहायला मिळत आहे.
नागपाडा चौक (रात्री ७ ते ९): नागपाडा चौकात (खडा पारसी, क्लेअर रोड) राजा रात्री ७ ते ९ या वेळेत पोहोचणार आहे. यावेळी विद्युत रोषणाई केलेली असते. तसेच या ठिकाणी प्रचंड गर्दीही पाहायला मिळते.
गोल देऊळ (रात्री १० ते १२): रात्री १० ते मध्यरात्री १२ च्या वेळेत राजा गोल देऊळ (टू टँक्स परिसरात) असतो. या ठिकाणी मध्यरात्री पर्यंत भक्तांची रेलचेल सुरुच असते.
ओपेरा हाऊस पूल (पहाटे २ ते ४): ७ सप्टेंबर रोजी पहाटे २ ते ४ या वेळेत राजा ओपेरा हाऊस पुलावरून जाणार आहे. याठिकाणी अनेक लोक रात्रभर जागून राजाला निरोप देण्यासाठी थांबलेले असतात.
गिरगाव चौपाटी (सकाळी ५ ते ७): यानंतर दुसऱ्या दिवशी ७ सप्टेंबरला पहाटेच्या वेळी गिरगाव चौपाटीवर पोहोचेल. लालबागच्या राजाच्या मिरवणुकीतील काही टप्पे सामाजिक एकतेचे प्रतीक आहेत. भायखळा स्टेशनवरील हिंदुस्तान मशीद येथे मशिदीच्या समिती सदस्यांकडून राजाचे स्वागत केले जाते. तसेच, भायखळा अग्निशमन दलाच्या जवानांकडून सायरन वाजवून विशेष श्रद्धांजली वाहिली जाते.