Warren Buffett : पैशांचे ते सापळे, या 5 मोहजाळ्यात अजिबात अडकू नका, वॉरेन बफेंचा गोल्डन मंत्र काय?
Tv9 Marathi September 07, 2025 04:45 PM

वॉरेन बफे, यांना कोण ओळखत नाही? त्यांच्या गुंतवणुकीचा टिप्स अनेक जण एकाग्रतेने ऐकतात आणि त्यावर अंमलबजावणी करतात. योग्य निर्णय आणि संयमाने केलेली गुंतवणूक हे त्यांच्या कोट्यधीश होण्याचे रहस्य आहे. कठीण आणि क्लीष्ट युक्त्या वापरून तुम्ही श्रीमंत होऊ शकत नाही. तर अगदी सामान्य चूका टाळल्या तरी तुम्ही श्रीमंतीची पायरी चढू शकता अशी दंतकथा बफे नेहमी सांगतात. 90 पार केलेला हा तरुण सध्या अब्जावधी डॉलर्सच्या बर्कशायर हॅथवे (Berkshire Hathaway) या कंपनीचे सीईओ आहेत.

पैशांची बचत आणि गुंतवणूक हीच श्रीमंतीची पायरी

आजही अनेक कोट्यधीश आणि लखपती त्यांचा आर्थिक सल्ला ऐकण्यासाठी आतूर असतात. बफे यांचे पैसा आणि गुंतवणुकीचे नियम ऐकण्यासाठी अनेक जण त्यांच्या मुलाखती ऐकतात, वाचतात. पैशांची बचत करणे आणि योग्य ठिकाणी ती गुंतवणे हे पैसा कमवण्यापेक्षा मोठे आव्हान असल्याचे वॉरेन बफे यांना वाटते. अनेक जण पैसा कमावण्याच्या प्रवासात मागे पडतात कारण ते पैशाच्या मोहमायेत, सापळ्यात अडकतात असे बफे यांना वाटते.

पैशांच्या या जाळ्यापासून दूर राहा

कर्जाचा विळखा : अनेक जण गरजा पूर्ण करण्यासाठी, हौस भागवण्यासाठी सातत्याने कर्ज काढतात. कर्ज हे बर्फाच्या गोळ्या सारखं आहे, ते हळू हळू मोठे होते आणि मग त्याला थांबवणे अवघड होऊन बसते, असे बफे सांगतात. क्रेडीट कार्ड, महागडे ईएमआय हे सापळे आहेत. वेळेवर तुम्ही हप्ता फेडला नाही तर मग तुम्ही अडकल्याशिवाय राहणार नाही.

खरेदीची वेडगळ हौस : काही जणांमध्ये शनिवार-रविवार आला की खरेदीचे भूत संचारते. काही खरेदी केली नाही की ते अस्वस्थ होतात. गरज नसताना काही जण भरमसाठ खरेदी करतात. महागडी कारपासून ते कपड्यांपर्यंत ज्यांची गरज नाही अशा वस्तूंचा पसारा घरात आणतात. मग पुढे गरजेच्या नसलेल्या वस्तूंसाठी गरजेच्या वस्तूंवर पाणी फेरावे लागत असल्याचे बफे म्हणतात.

चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक : शेअर बाजारात चुकीच्या स्टॉकवर केलेली गुंतवणूक फसवी ठरते. अथवा योग्य विचार न करता कुठेही गुंतवलेले पैसा जास्त फायदा करून देत नाही. झटपट पैसा कमाविण्याचा हा ट्रॅप महागात पडतो. जे कळत नाही, तिथे गुंतवणुकीचा अट्टहास वेडगळ ठरत असल्याचे बफे म्हणतात.

अत्यावश्यक रक्कम हाताशी न ठेवणे : कधी कधी उधळपट्टी आपण इतके बेफिकीर होतो की, हाताशी, गाठीशी काही पैसा ठेवावा असं आपल्याला वाटत नाही. जेव्हा नोकरी जाते. आजारी पडता अथवा अचानक एखादा मोठा खर्च पुढ्यात येतो, तेव्हा मग याची त्याची दाढी कुरवाळावी लागते. बफे यांचा यावर एक मार्मिक मंत्र आहे. खर्च केल्यावर उरते ती बचत नाही, तर खर्च करण्यापूर्वी हुशारीने वाचवलेली रक्कम ही खरी बचत असते, असा त्यांचा गोल्डन रूल आहे.

श्रीमंतीचा कोणताही शॉर्टकट नाही : बफे यांच्या मते, श्रीमंतीचा कोणताही शॉर्टकट नाही. झटपट श्रीमंत होण्याचा सापळा वेळीच ओळखा. या मायाजालात तुम्ही अडकलात तर पैस तर हातचे जातीलच पण हाती फारसं काही लागणार नाही. अनेकजण लॉटरी, जुगारात घरदार विकतात आणि आपल्या नशिबात नव्हतं म्हणून मग हात चोळत बसतात. हा मूर्खपणा आहे. करदोड्याला दोरखंड म्हणून उडी माराल तर तोंडावर आपटाल असं त्यामागील त्यांचं लॉजिक आहे. त्यामुळे यशाला आणिश्रीमंतीला शॉर्टकट नसतो. तर नियोजन आणि संयम गरजेचा असतो असं बफे यांचे मत आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.