उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत शिवसेना खासदारांची महत्वपूर्ण बैठक
Marathi September 07, 2025 09:25 PM

नवी दिल्ली: महाराष्ट्राचे राज्यपाल महामहीम डॉ. सी. पी. राधाकृष्णन हे एनडीएचे उमेदवार म्हणून उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीकरिता उभे आहेत. एनडीएचा घटक पक्ष असलेल्या शिवसेना पक्षाच्या खासदारांची एक महत्वपूर्ण बैठक शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना संसदीय गटनेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सोमवारी दिल्लीत बोलावली आहे. तसेच आजच रात्री, रविवारी सर्व खासदारांना दिल्लीत येण्याचे निर्देश खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिले आहेत.

सी. पी. राधाकृष्णन यांना निवडून आणण्याचा चंग

येत्या 9 सप्टेंबर रोजी उपराष्ट्रपती पदाची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी एनडीएकडून महाराष्ट्राचे राज्यपाल डॉ. सी. पी. राधाकृष्णन यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेना पक्षाचे मुख्य नेते व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वीच डॉ. सी. पी. राधाकृष्णन यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. डॉ. सी. पी. राधाकृष्णन यांच्या विजयासाठी शिवसेना पक्षाच्या लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांची महत्वपूर्ण बैठक सोमवार, 8 सप्टेंबर रोजी दुपारी 12.30 वाजता खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी बोलावली आहे. उपराष्ट्रपती पदाचे एनडीएचे उमेदवार डॉ. सी. पी. राधाकृष्णन यांना जास्तीतजास्त मतांनी निवडून आणण्याचा चंग डॉ. श्रीकांत शिंदे यांनी बांधला आहे. डॉ. श्रीकांत शिंदे हे या निवडणुकीवर विशेष लक्ष ठेवून असून मतदान कसे करावे, काय काय काळजी घ्यावी, अशा सूचना आधीच शिवेसनेच्या सर्व खासदारांना केल्या असल्याची माहिती शिवसेना प्रवक्ते खासदार नरेश म्हस्के यांनी दिली आहे.

लोकसभा-राज्यसभा खासदार उपस्थित राहणार

शिवसेनेचे लोकसभा आणि राज्यसभेतील सर्व खासदार दिल्लीतील बैठकीला उपस्थित राहणार आहेत. उपराष्ट्रपती निवडणूक हा राष्ट्रीय राजकारणातील महत्त्वाचा टप्पा मानला जातो. एनडीए घटक पक्ष म्हणून शिवसेनेची मतं निर्णायक ठरू शकतात. त्यामुळे खासदारांची उपस्थिती आणि मतदान शिस्तबद्ध पार पडणे आवश्यक आहे, असे पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे..

एनडीए उमेदवाराला शिवसेनेचा पाठिंबा

शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी यापूर्वीच डॉ. सी. पी. राधाकृष्णन यांना पक्षाचा पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे उपराष्ट्रपती निवडणुकीत एनडीएच्या उमेदवाराला जास्तीत जास्त मतांची जोड मिळावी, यासाठी पक्षातर्फे विशेष प्रयत्न सुरू आहेत. डॉ. श्रीकांत शिंदे हे स्वतः या निवडणुकीवर लक्ष ठेवून असून, मतदान प्रक्रिया कशी पार पाडावी, मतपत्रिकेची काळजी कशी घ्यावी, याबाबत त्यांनी खासदारांना सूचना दिल्या आहेत.

आणखी वाचा

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.