नेरूळ टपाल कार्यालयाला गळती
नागरिक आणि कर्मचारी त्रस्त; ग्राहकांच्या सुविधांवर गंभीर परिणाम
जुईनगर, ता. ७ (बातमीदार) ः नेरूळ येथील विस्तारित टपाल कार्यालयाच्या छतातून पाण्याची गळती होत असल्यामुळे नागरिकांसह कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे ग्राहकांची पत्रे, पार्सल्स तसेच इतर महत्त्वाची कागदपत्रे भिजण्याचा धोका निर्माण झाला आहे. याशिवाय, कर्मचाऱ्यांना काम करताना भिजण्याची आणि सतत गळतीसह काम करण्याची अडचण भासत आहे.
नेरूळ येथील टपाल विस्तार कार्यालय अंबिका शॉपिंग सेंटर, सेक्टर आठ येथे आहे. नेरूळ पश्चिम परिसरातील नागरिकांना मुख्य टपाल कार्यालयातील गर्दी टाळण्यासाठी आणि ग्राहक सेवा सुरळीत करण्यासाठी हे विस्तार कार्यालय सुरू करण्यात आले आहे. या कार्यालयात नियमितपणे अनेक खातेदार, पार्सल पाठवणारे ग्राहक, रक्षाबंधनासारख्या सणाच्या वेळी राखी पाठवण्यासाठी येणाऱ्या गृहिणी तसेच भविष्य निर्वाह निधी किंवा इतर खातेदार येतात; मात्र आधीच अपुऱ्या सुविधांमुळे नागरिकांना अडचण भासत होती; आता पाणी गळतीने ही समस्या अधिकच गंभीर झाली आहे.
कार्यालयाच्या छतातील जुनी आणि जीर्ण झालेली स्थिती या गळतीचे मुख्य कारण असल्याचे बोलले जात आहे. प्रत्येक वर्षी पावसाळ्यात कार्यालयात पाणी गळते, ज्यामुळे ग्राहकांना आणि कर्मचाऱ्यांना कामकाजात अडचण येते. टपाल कार्यालयात बसण्यासाठी ठेवलेल्या बेंचवर पाणी टपकत असल्यामुळे विशेषत: ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला आणि लहान मुलांसह ग्राहकांना उभे राहावे लागते. पाणी गळतीमुळे ग्राहकांची रांग ताटकळत उभी राहते, ज्यामुळे नागरिकांचा असंतोष वाढत आहे. कार्यालयातील सफाई कर्मचारी सतत गळतीचे पाणी साफ करण्याचा प्रयत्न करीत आहेत. काही टेबलांवर बॅनर किंवा कापड ठेवून फर्निचर खराब होऊ नये, यासाठी उपाययोजना केली जात आहे; मात्र कामकाज सुरळीत पार पाडणे कठीण झाले आहे. पावसाळ्यात दरवर्षी अशीच समस्या उद्भवते, तरीही कार्यालयाचे छत दुरुस्ती करून गळती थांबविण्याची ठोस उपाययोजना अजून करण्यात आलेली नाही.
..............
स्थानिक नागरिक अर्जुन चव्हाण यांनी सांगितले, की टपाल कार्यालयाचा नेरूळ पश्चिमेला विस्तार करणे ही चांगली कल्पना होती; परंतु अपुऱ्या सुविधा आणि पाणी गळतीमुळे कार्यालय चालवणे कठीण झाले आहे. नागरिकांना सतत त्रास सहन करावा लागतो. अपुरे मनुष्यबळ आणि उपकरणांचा अभाव असल्यामुळे कार्यालयाच्या कामकाजात गंभीर अडचण निर्माण झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून पावसाळ्यात दरवर्षी पाणी गळतीची समस्या निर्माण होते. तरीही प्रशासनाकडून वेळेवर दुरुस्ती न झाल्यामुळे नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.