मुरूड शहरात गढूळ पाण्यामुळे हाल
स्थानिकांचे आरोग्य धोक्यात; स्वच्छ पाणीपुरवठ्याची मागणी
मुरूड, ता. ७ (बातमीदार) : शहरात गेल्या काही दिवसांपासून गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या दूषित पाण्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून, काही भागात आजारपणाचे प्रमाणही वाढले आहे. शुद्ध पाणी न मिळाल्याने नागरिकांना विकतचे पाणी खरेदी करून मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. पावसाचे प्रमाण कमी झाल्यानंतरही गढूळ पाणीपुरवठ्याची समस्या कायम राहिल्याने नागरिकांत संताप निर्माण झाला आहे.
या पार्श्वभूमीवर शहरातील नागरिकांनी एकत्र येऊन मुरूड नगर परिषदेच्या कार्यालयात भेट देत तातडीने शुद्ध पाण्याचा पुरवठा सुरू करण्याची मागणी केली. या वेळी नागरिकांनी नगर परिषदेचे कार्यालयीन अधीक्षक नंदकुमार आंबेतकर आणि पाणीपुरवठा विभागाच्या अभियंता सोनल पाटील यांची भेट घेऊन आपल्या तक्रारी मांडल्या. शिष्टमंडळात व्यापारी ललित जैन, पद्मदुर्ग व्यवसायिक संघटनेचे अध्यक्ष अरविंद गायकर, कुणाल सतविडकर, आदेश दांडेकर, महेश कारभारी, जाहिद फकजी, जगदीश दिवेकर, उमेश भोईर, राहुल कासार, प्रतीक उमरोटकर, प्रदीप बागडे, रूपेश रणदिवे, सुशील ठाकूर आदींचा समावेश होता. ललित जैन यांनी गारंबी धरण परिसरात तारेचे कंपाउंड उभारण्याची गरज असल्याचे सांगितले. तसेच जलशुद्धीकरण प्रकल्प गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असल्याने तो तातडीने सुरू करण्याची मागणी केली. पाण्यात टीसीएल आणि इतर रसायनांचा जास्त वापर करू नये, कारण ते मानवी आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते, असेही त्यांनी नमूद केले, तर रूपेश रणदिवे यांनी गढूळ पाण्यामुळे नागरिक आजारी पडत असल्याचा आरोप करत, आरोग्य विभागाने शहरातील दवाखान्यांना भेट देऊन तपास करावा, अशी मागणी केली. आदेश दांडेकर यांनीही काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले. सवतकडा जलयोजना शहराच्या गरजांसाठी वापरली जात नसल्याची तक्रार शिष्टमंडळाने केली.
...................
शुद्धीकरण प्रकल्प बंद
त्यानंतर नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांसोबत शिष्टमंडळाने जलशुद्धीकरण प्रकल्पाची पाहणी केली असता, तो पूर्णपणे बंद असल्याचे निदर्शनास आले. सध्या तुरटी आणि टीसीएल पावडर वापरूनच पाणीपुरवठा सुरू असल्याचे स्पष्ट झाले. यावर अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर शुद्धीकरण प्रकल्प कार्यान्वित करून नागरिकांना शुद्ध व स्वच्छ पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन दिले. गढूळ पाण्यामुळे निर्माण झालेला आरोग्याचा धोका दूर करण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे अन्यथा नागरिकांचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.