तात्या लांडगे
सोलापूर : डीजेमुक्त सोलापूर कृती समिती व त्यांच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक, डॉक्टर्स, शाळकरी मुलांसह सर्वांनीच डीजेमुक्त सोलापूरची मागणी केली होती. त्यानुसार गणेशोत्सवात शहरातील सर्व मध्यवर्ती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सकारात्मकता दर्शविली. लोकप्रतिनिधींनीही सहकार्य केले आणि डीजेवाल्यांनीही आमचा निर्णय मान्य केला, त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव डीजेमुक्त तरी मोठ्या उत्साहात, आनंदात पार पडल्याचे पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांनी सांगितले. त्याबद्दल त्यांनी सर्व सोलापूरकरांचे आभारही मानले.
गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे किंवा एक बेस एक टॉप लावण्यास पोलिसांकडून परवानगी घ्यावी, असा आग्रह एक मंडळ लष्कर मध्यवर्ती मंडळातील काही मंडळाला करीत होते. पोलिसांना त्याची खबर लागली आणि पोलिस आयुक्तांनी शुक्रवारी (ता. ५) रात्री स्वत: लष्कर मध्यवर्ती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांना कायदा व सोलापूरकरांची मागणी, न्यायालयाचा निकाल अशा बाबींची माहिती दिली. त्यानंतर कोणीही डीजेची मागणी केली नाही. इतर काही मंडळांनीही शेवटच्या दिवशी शनिवारी कमी आवाजात डीजे लावण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी त्यांचा डाव यशस्वी होऊ दिला नाही. याशिवाय शहरातील सातही पोलिस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी प्रत्येक मध्यवर्ती मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद व मिरवणूक मार्गांचीही पहाणी केली. मिरवणूक दरवर्षी ज्या ठिकाणी रेंगाळते आणि ज्या कारणांमुळे रेंगाळते, त्यावरील उपाययोजनांवरही यंदा पोलिस आयुक्तांनी विशेष भर दिल्याचे दिसून आले. याशिवाय बंदोबस्तावरील वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून होमगार्डपर्यंतच्या सर्वांनाच मिरवणुकीच्या दिवशी नेमके काय करायचे, याचेही मार्गदर्शन करण्यात आले होते. त्यासाठी शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत पोलिस आयुक्तांनी सर्वांच्या बैठका घेतल्या होत्या. त्यानुसार कार्यवाही झाली आणि यंदा पहिल्यांदाच उत्सवप्रिय सोलापूर शहरातील गणेश विसर्जन मिरवणुका पारंपारिक वाद्यांच्या गजरात पार पडल्याचे दिसून आले.
यंदा १९५ मंडळांच्या डीजेमुक्त मिरवणुका
गणेशोत्सवानिमित्त शहरात एकूण एक हजार १४७ सार्वजनिक मंडळांनी गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना केली होती. उत्सवाच्या शेवटच्या दिवशी शनिवारी (ता. ६) ९ मध्यवर्ती मंडळांसह त्याअंतर्गत समाविष्ट असलेल्या १९५ मंडळांनी डीजेमुक्त विसर्जन मिरवणुका काढल्या. प्रत्येक मंडळाने पारंपरिक वाद्य व पारंपरिक खेळ, सांस्कृतिक कार्यक्रमांनाच प्राधान्य दिले होते. गतवर्षीच्या तुलनेत यंदा डीजेमुक्तीमुळे १३७ मंडळांनी मिरवणुकांमध्ये सहभाग नोंदविल्याचे दिसले नाही. मिरवणुकीवरील खर्च टाळून या मंडळांनी अन्नदान, सामाजिक देखावे अन् प्रबोधनाचे कार्य केले. डीजेमुक्तीचा हा सकारात्मक परिणाम यंदा दिसून आला. सोलापूर शहरात गणपतीची प्रतिष्ठापना केलेल्या मंडळांपैकी ४३ मंडळांनी १० दिवसांच्या आत गणेश मूर्तींचे विसर्जन केले होते. उर्वरित एक हजार १०४ मंडळांपैकी ६८ मंडळांनीही स्वतंत्रपणे मूर्तींचे विसर्जन केले. तसेच मिरवणुका न काढता ज्यांच्या त्यांच्या वाहनांमधून ५८१ मंडळांनी गणेश मूर्तींचे विसर्जन केल्याची माहिती पोलिसांनी दिली. मूर्तींचे जागेवरच विसर्जन करणाऱ्या मंडळांची संख्या २५५ होती. तसेच सोलापूर शहरातील नऊ मध्यवर्ती मंडळांमध्ये १९५ मंडळे सामील झाली होती. उर्वरित पाच मंडळांपैकी तीन मंडळांची विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडली, तर दोन मंडळांनी मिरवणूक काढली नाही. याशिवाय सोलापूर शहरातील दोन लाख ५५ हजार घरगुती गणेश मूर्तींचेही शांततेत विसर्जन करण्यात आले.
लाखो रुपयांची बचत; मंडळे खरेदी करणार लेझीम
दरवर्षी डीजेवर होणारा लाखो रुपयांचा खर्च यंदाच्या गणेशोत्सवात झाला नाही. अनेक मंडळांनी डीजे नसल्याने मिरवणुका देखील काढलेल्या नाहीत. त्यामुळे आगामी उत्सवापूर्वी संबंधित मंडळांना आता त्या रकमेतून लेझीम, झांज, ढोल, टिपरी असे स्वत:चेच साहित्य खरेदी करता येणार आहे. मंडप, डेकोरेशन देखील काही मंडळे खरेदी करतील, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. डीजे नसल्याने यावर्षी आगमन व विसर्जन मिरवणुका शांततेत, मोठ्या उत्साहात निघाल्या. मिरवणुका पाहायला आलेल्यांमध्ये महिला, लहान मुलांची संख्या मोठी होती, असे निरीक्षण पोलिसांनी नोंदविले आहे.