कुरार गावातील कचरा पालिकेने उचलला
कांदिवली, ता. ७ (बातमीदार) ः मालाड पूर्व आप्पा पाडा रिक्षा स्टॅण्ड, कुरार गाव, शिवाजीनगर, क्रांतीनगर, लोखंडवाला, गोकुळ नगर येथील झोपडीधारक कचऱ्यामुळे हैराण झाले होते. पालिका पी उत्तर घनकचरा विभागाकडून वेळोवेळी कचरा उचलला जात नसल्याने जागोजागी ढिगारे साचले होते. यासंदर्भात ‘सकाळ’च्या ५ सप्टेंबरच्या अंकात वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. याची दखल घेत येथील कचरा उचलण्यात आला आहे.
ओल्या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली होती. उघड्यावर फेकलेल्या कचऱ्यात अन्न शोधण्यासाठी कुत्री, मांजरांचा वावर वाढला होता. स्थानिकांना याच कचऱ्यातून मार्गक्रमण करावे लागत होते. पालिका घनकचरा विभागाचे मुख्य पर्यवेक्षक अजय शिंदे, कनिष्ठ पर्यवेक्षक उन्मेश देशमुख यांनी कर्मचाऱ्यांच्या मदतीने सर्व परिसर चकाचक करून, औषध फवारणी केली. त्यामुळे गणेशोत्सवात स्थानिक नागरिक, प्रवासी आणि वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे.