महायुती सरकारमध्ये भाजप आणि घटक पक्षातील ताळमेळ बसत नसल्याच्या चर्चा सातत्याने पुढे येतात. मुंबईतील मराठा आरक्षण आंदोलनावेळी तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ठरवून एकटं पाडल्याच्या वावड्या उठल्या. उपमुख्यमंत्री अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांनी मुंबई काही जवळ केली नाही. त्यानंतर आता अनेक वृत्तपत्रांमध्ये पानभर जाहिरातीत आणि मुंबईत देवाभाऊंनी आभाळ व्यापून टाकले. या जाहिरातीत ना एकनाथ शिंदे आहेत ना अजितदादा आहेत. त्यामुळे सत्ताधारी पक्षात श्रेयवादाची लढाई सुरू झाल्याचे बोलले जात आहे. कुरघोडीच्या या राजकारणात अडचणी आलेले मुख्यमंत्री देवेंद्र ठरल्याची चर्चा सुरू आहे. महायुतीत खरंच सर्व काही आलबेल आहे?
त्या जाहिरातीवर शिंदेंची प्रतिक्रिया काय?
देवाभाऊ अशी जाहिरात महाराष्ट्रात धुमाकूळ घालत आहे. वृत्तपत्राच्या पहिल्याच पानावर या जाहिरीतीने राज्याचे लक्ष वेधून घेतले. या जाहिरातीत केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच जागा व्यापली आहे. महायुतीच्या सरकारमधील ब्रह्मा,विष्णू,महेश ही चर्चा इतक्या लवकर मागे पडली याचे सर्वांनाच नवल आहे. केवळ एकच देवाभाऊ या जाहिरातीत आहे. एकनाथ शिंदे आणि अजितदादांची दखल जाहिरातीने घेतलेली नाही.
या सर्व प्रकरणावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महायुतीत तणाव असल्याचे दिसून आल्यावर शिंदे यांनी त्यावर उत्तर दिले. महायुतीतील घटक पक्षांमध्ये, नेत्यांमध्ये कामाचे श्रेय लाटण्याची कोणतीची चढाओढ नाही. स्पर्धा नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत ते एका टीमप्रमाणे काम करत असल्याचे शिंदे म्हणाले.
शनिवारच्या जाहिरातीने चर्चेचे पेव
शनिवारी राज्यातील वृत्तपत्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही जाहिरात प्रसिद्ध झाली. त्यात फडणवीस हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला फुलं वाहताना दाखवण्यात आले आहे. तर दुसऱ्या एका जाहिरातीत त्यांना अनंत चतुर्दशीला गणपतीची पूजा करताा दाखवण्यात आले आहे. दोन्ही जाहिरातीत देवाभाऊ असे लिहिण्यात आले आहेत. ही जाहिरात कोणी छापली हे स्पष्ट झालेले नाही. पण या जाहिरातीवर मोठा खर्च करण्यात आला हे उघड आहे. उद्धव सेनेचे खासदार संजय राऊतांनी या उद्धळपट्टीवर सडकून टीका केली आहे.
जाहिरातीचा उद्देश तरी काय?
ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर शनिवारी ठाण्यातील एका सार्वजनिक कार्यक्रमात पत्रकारांशी शिंदे यांनी संवाद साधला. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस स्वतःला मराठा आरक्षणाचे निर्मिते म्हणून समोर आणत असल्याबाबत त्यांना प्रश्न करण्यात आला.
त्यावर आम्ही श्रेयवादाच्या कोणत्याही लढाईत नाही. मग ते मराठा आरक्षण असो वा इतर मागासवर्गाचे हक्क असो, महायुती सरकारने ही कामं केली आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीतच त्याची चुणूक दिसली होती. आता देवेंद्रजी आणि मी एका टीमच्या रुपाने आमचा दुसरा सामना खेळत आहोत. पुढे सुद्धा आमचा अजेंडा तोच राहील. राज्याचा विकास आणि गरीब, गरजूंची मदत करणे हा आमचा उद्देश आहे, असे ते म्हणाले.