ऊर्से येथे डीजेच्या तालावर उत्साहात गणेश मिरवणूक
esakal September 09, 2025 06:45 AM

ऊर्से, ता. ७ : येथील सार्वजनिक गणेश मंडळांनी डीजेच्या दणदणाटात जल्लोषात गणरायाची मिरवणूक काढली. सुमारे चार तासांनंतर गणरायाचे विसर्जन उत्साहात पार पडले. यावर्षी जागृती मित्र मंडळ व शिवतेज मित्र मंडळ यांनी केलेली फुलांची आकर्षक सजावट आणि विद्युत रोषणाई विशेष आकर्षण ठरली. मिरवणूक फेरीत ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!’ अशा घोषणांनी गाव परिसर दणाणून गेले होता.
दरम्यान, शिवतेज मित्र मंडळाने विद्युत रोषणाईसह फुलांची सुंदर सजावट केली होती. तसेच, शिवाई मित्र मंडळ, जागृती मित्र मंडळ, शिवशक्ती मित्र मंडळ, गणेश मित्र मंडळ आणि आंबेवाडी येथील जय मल्हार मित्र मंडळ यांनीही मिरवणुकीसाठी आकर्षक फुलांची सजावट आणि रोषणाई केली होती.
यावर्षी मंडळांनी डीजेच्या तालावर मिरवणूक काढत भक्तीचा आणि उत्साहाचा जल्लोष केला. लहानांपासून मोठ्यांपर्यंत, महिलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी मिरवणुकीत उत्स्फूर्त सहभाग घेतला. भंडाऱ्याच्या उधळणीमुळे मिरवणुकीला अधिकच रंगत आली. महिलांनीही ठेका धरत आनंद लुटला. शिरगाव-परंदवडी येथील पोलिसांनी काटेकोर बंदोबस्त ठेवत मिरवणुका शांततेत पार पाडल्या. गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.