चिपळूण अर्बन बँकेला महाराष्ट्रातील 'सर्वोत्कृष्ट बँक' पुरस्कार
esakal September 09, 2025 06:45 AM

‘चिपळूण अर्बन’ला
‘सर्वोत्कृष्ट बँक’ पुरस्कार
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ७ : दि चिपळूण अर्बन को-ऑप. बँक लि., चिपळूणला २०२४-२५ साठी महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशनतर्फे ‘सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार’ जाहीर झाला आहे. ३०० ते ५०० कोटी ठेवी असलेल्या बँकांमध्ये प्रथम क्रमांकाचा हा मानाचा पुरस्कार संपूर्ण राज्यातील बँकिंग क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरीसाठी दिला जातो.
दरवर्षी आयोजित होणाऱ्या या पुरस्कार समारंभाद्वारे सहकारी बँकिंग क्षेत्रातील उत्तम कामगिरी करणाऱ्या सभासद नागरी सहकारी बँकांचे सन्मान केले जाते. चिपळूण अर्बन बँकेस मिळालेला हा पुरस्कार फक्त बँकेच्या लौकिकात भर घालत नाही तर संचालक, व्यवस्थापन, कर्मचारी, सभासद, ग्राहक आणि हितचिंतक यांना नवे चैतन्य आणि आनंद देतो. पुरस्कार वितरण समारंभ १३ सप्टेंबरला दुपारी २:३० वाजता पंचवटी, नाशिक येथील ‘श्री स्वामीनारायण कन्वेन्शन सेंटर’ येथे होणार आहे.
संचालक मंडळाच्या सूचनेनुसार, मुख्य कार्यकारी अधिकारी तुषार सूर्यवंशी व सर्व अधिकारी व कर्मचारीवर्गाने प्रचंड मेहनत घेतल्याने हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. बँकेचे अध्यक्ष मोहनशेठ मिरगल यांनी कोअर कमिटी सदस्य, माजी संचालक, कर्मचारी तसेच सभासद, ग्राहक व हितचिंतक यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे असल्याचे नमूद केले. अध्यक्ष मोहनशेठ मिरगल व उपाध्यक्ष रहिमान दलवाई यांनी सर्व अधिकारी, संचालक मंडळ सदस्य यांचे आभार व्यक्त केले.

....... खान......

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.