मुंबईत स्वतःच्या हक्काचे घर सर्वसामान्य, कष्टकरी माणसाच्या आवाक्याबाहेर गेले आहे. अशात गोरेगाव (पश्चिम) येथील मोतीलाल नगरच्या पुनर्विकासात मात्र येथील रहिवाशांना तब्बल १६०० स्क्वे. फूट बांधकाम क्षेत्राचे (बिल्ट अप) भलेमोठे घर म्हाडाकडून दिले जाणार आहे. म्हाडाच्या मोतीलाल नगर १, २ व ३ या चाळी आता खूपच जुन्या आणि बकाल झाल्या असून ३७०० हून अधिक रहिवासी अनेक वर्षांपासून नव्या घराच्या प्रतीक्षेत आहेत. म्हाडा स्वतःच हा पुनर्विकास करणार असल्याने ठरवलेल्या वेळेत, कोणत्याही फसवाफसवीशिवाय रहिवाशांना हक्काचे नवीन घर मिळणार आहे.
यातील सर्वांत महत्वाचा भाग म्हणजे १६०० स्क्वे. फुटांचे घर, ज्यामुळे अख्ख्या मुंबईत खळबळ उडाली आहे कारण मुंबईत आजवर कोणत्याही पुनर्विकासात रहिवाशांना एवढे मोठे घर मिळालेले नाही. नुकतेच वरळी बीडीडीतील रहिवाशांनाही ५०० स्क्वे. फुटांचेच घर मिळाले. मात्र गोरेगावसारख्या ‘प्राईम’ भागात सध्या २८० स्क्वे. फुटांच्या घरात राहणाऱ्या लोकांना १६०० स्क्वे. फुटांचे नवे-चकाचक घर मिळेल.
आज मुंबईत ३००-३५० स्क्वे. फुटाचे घर घ्यायलाही घाम फुटतो, त्यामुळेच लोक विरार, कल्याण-डोंबिवली, बदलापूर-अंबरनाथ असे दूरवर राहायला जातात. अशात गोरेगावातील हे घर स्थानिकांना ‘जॅकपॉट’ आहेच पण त्यांच्या पुढच्या पिढ्यांसाठीही सोन्यासारखी गुंतवणूक आहे. त्यामुळे मोतीलाल नगरची माहिती बातम्यांमधून बाहेर येऊ लागताच याबाबत मुंबईत गरमागरम चर्चा वाढली आहे.
रिअल इस्टेटवाल्यांना खबर लागताच होश उडाले!
मोतीलाल नगर एक आधुनिक ‘टाऊनशिप’ बनत असल्याने रिअल इस्टेट क्षेत्रासाठी हा ‘हॉट स्पॉट’ बनणार आहे. नव्या घरांच्या विक्री, भाडेकरारांना जबरदस्त किंमत मिळणार असल्याने या धंद्यातील लोकांचे ‘कान’ आतापासूनच टवकारले गेलेत.
“नव्या मोतीलाल नगरात १६०० स्क्वे. फूट बिल्ट अपच्या घराला आणखी सहा-सात वर्षांनी किमान दोन-अडीच लाख रुपये भाडे मिळेल. त्यामुळे रहिवाशांची चंगळ होईलच शिवाय या व्यवहारांतून एजंटांनाही चांगला फायदा होईल.” असे गोरेगावमधील रिअल इस्टेटमध्ये गेली तीस वर्षे काम करणाऱ्या एजंटने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
“आमच्या दोन पिढ्या अरूंद, चिंचोळ्या घरांत दाटीवाटीने राहण्यात गेल्या. ही घरेही आता मोडकळीस आली आहेत. म्हाडा आता आमच्या वसाहतीचा पुनर्विकास करते आहे. आम्हाला आता सुसज्ज असे घर मिळणार असल्याने आमच्या पुढील पिढ्यांचे कल्याण होणार आहे.” अशी प्रतिक्रिया मोतीलाल नगरमधील स्थानिक रहिवासी आणि गृहिणी असलेल्या नेहा गुप्ते यांनी दिली.
स्थानिक राजकारणाला लोक कंटाळले
म्हाडाने पुनर्विकास करायचे ठरवल्यापासून मोतीलाल नगरमध्ये अनेक समित्या-संघटनांनी प्रकल्पाच्या विरोधात प्रचार सुरु केला आहे. मात्र या समित्यांमध्ये आपापसांतच अनेक भांडणे लागली असून ही मंडळी एकमेकांच्याच विरोधात उभी राहिली आहेत. यामुळे रहिवाशांचे नुकसान होत असल्याची भावना स्थानिकांमध्ये आहे.