नियतीचा क्रूर खेळ… एका अपघातात तीन पिढ्या संपल्या, हृदय पिळवटून टाकणाऱ्या अपघाताने महाराष्ट्र हादरला
Tv9 Marathi September 10, 2025 07:45 PM

सांगली-भिलवडी मार्गावर मंगळवारी दुपारी झालेल्या एका भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तीन व्यक्तींचा दुर्दैवी मृत्यू झाला. यात आजी, आजोबा आणि त्यांच्या पाच वर्षांच्या नातवाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात कार आणि दुचाकीच्या धडकेमुळे झाला. या अपघातात कारमधील चार शिक्षक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघातामुळे शिक्षक दिनाचा उत्साह आणि पुरस्काराचा आनंद घेऊन परतणाऱ्या शिक्षकांच्या आनंदावर विरजण पडले आहे. तर दुसरीकडे एका कुटुंबाचा प्रवास क्षणार्धात संपला.

नेमकं काय घडलं?

मंगळवारी (९ ऑक्टोबर) दुपारी सांगली-तासगाव मार्गावर तासगाव शहरापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या चेतना पेट्रोल पंपाजवळ एक भीषण अपघात घडला. यावेळी समोरून वेगाने येणाऱ्या मारुती सुझुकी एर्टिगा (MH-10-CE-4241) गाडीने दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की दुचाकीवरील तिघेही हवेत उडाल्यानंतर खाली कोसळले. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. या धडकेनंतर दोन्ही वाहने रस्त्याच्या कडेला असलेल्या द्राक्षबागेत जाऊन पडली. यावेळी दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर झाला होता.

या भीषण अपघातात एकाच दुचाकीवरील आजी, आजोबा आणि त्यांच्या पाच वर्षांच्या नातवाचा दुर्दैवी अंत झाला. हे सर्वजण पलूस तालुक्यातील बुर्ली गावचे रहिवासी होते. शिवाजी बापू सुतार (वय ५७), त्यांची पत्नी आशाताई शिवाजी सुतार (वय ५५) आणि त्यांचा लाडका नातू वैष्णव ईश्वर सुतार (वय ५) असे या दुर्घटनेतील मृतांची नाव आहेत. हे सर्वजण दुचाकीवरून काकडवाडी येथे नातेवाईकांना भेटून आपल्या घराकडे परत येत होते.

तर एर्टिगा गाडीत सांगलीतील एका नामांकित शिक्षण संस्थेतील शिक्षक होते. हे सर्वजण कडेपूर येथील आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्याला गेले होते. यातील स्वाती कोळी यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला होता. या पुरस्काराचा आनंद घेऊन परतत असतानाच काळाने त्यांच्या आनंदावर विरजण टाकले. या अपघातात गाडीतील चारही शिक्षक गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या अपघातामुळे एका क्षणात एका कुटुंबाचा प्रवास संपला. तर दुसऱ्या कुटुंबाचा आनंद दु:खात बदलला. या अपघाताने केवळ बुर्ली गावावरच नाही, तर संपूर्ण सांगली जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. सध्या याचा पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे रस्त्यांवरील वाढत्या अपघातांवर पुन्हा एकदा गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.