AFG vs HK : राशीदच्या नेतृत्वात अफगाणिस्तानचा पहिल्याच सामन्यात धमाका, आशिया कपमध्ये सर्वात मोठा विजय, हाँगकाँगचा 94 धावांनी धुव्वा
GH News September 10, 2025 08:17 PM

राशीद खान याच्या नेतृत्वात अफगाणिस्तान क्रिकेट टीमने टी 20I आशिया कप 2025 स्पर्धेत दणक्यात सुरुवात केली. या स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात अफगाणिस्तान विरुद्ध हाँगकाँग आमनेसामने होते. अफगाणिस्तानने शेख झायेद स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात हाँगकाँगवर एकतर्फी विजय मिळवला. अफगाणिस्तानने हाँगकाँगला विजयासाठी 189 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र हाँगकाँगला 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 94 धावाच करता आल्या. अफगाणिस्तानने यासह 94 धावांनी विजय मिळवला. अफगाणिस्तानचा हा ऐतिहासिक विजय ठरला. टी 20 आशिया कप स्पर्धेतील धावांबाबत एकूण तिसरा तर अफगाणिस्तानचा सर्वात मोठा विजय ठरला.

सामन्यात काय झालं?

अफगाणिस्तानने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. अफगाणिस्तानने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 188 रन्स केल्या. अफगाणिस्तानसाठी सेदीकुल्लाह अटल आणि अझमतुल्लाह ओमरझई या दोघांनी अर्धशतकी खेळी केली. तर मोहम्मद नबी याने निर्णायक योगदान दिलं. त्यानंतर अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करत हाँगकाँगला 94 धावांवर यशस्वीरित्या रोखलं.

ओमरझईचं विक्रमी अर्धशतक

ओमरझईने पहिल्याच सामन्यात धमाका केला. ओमरझईने सूर्यकुमार यादव याचा रेकॉर्ड ब्रेक करत टी 20 आशिया कप स्पर्धेतील सर्वात वेगवान अर्धशतक ठोकलं. ओमरझईने अवघ्या 20 बॉलमध्ये पहिलंवहिलं अर्धशतक ठोकलं. ओमरझईने 20 बॉलमध्ये 5 सिक्स आणि 2 फोरसह अर्धशतक पूर्ण केलं. तर ओमरझई 21 व्या बॉलवर आऊट झाला. अझमतुल्लाह याने 53 रन्स केल्या. अफगाणिस्तानसाठी सेदीकुल्लाह अटल याने सर्वाधिक 73 धावा केल्या. तर मोहम्मद नबी याने 33 धावा केल्या.

हाँगकाँगचा धुव्वा

त्यानंतर अफगाणिस्तानने विजयी धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरेलल्या हाँगकाँगला सुरुवातीपासून झटके दिले. अफगाणिस्तानने सातत्याने झटके दिल्याने हाँगकाँगला 100 पारही पोहचता आलं नाही. अफगाणिस्तानसाठी फझलहक फारुकी आणि गुलाबदीन नईब या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या.

आशिया कपमधील सर्वात मोठा विजय

दरम्यान टी 20 आशिया कप स्पर्धेच्या इतिहासात पाकिस्तानने धावांबाबत सर्वात मोठ्या फरकाने विजय मिळवला आहे. पाकिस्तानने 2022 साली हाँगकाँग विरुद्ध 155 धावांच्या फरकाने विजय मिळवला होता. तर टीम इंडियाने 2022 मध्ये अफगाणिस्तानचा 101 धावांनी धुव्वा उडवला होता.

अफगाणिस्तानचे उर्वरित 2 सामने केव्हा?

दरम्यान अफगाणिस्तान या मोहिमेतील आपला दुसरा सामना 16 सप्टेंबरला बांगलादेश विरुद्ध भिडणार आहे. तर अफगाणिस्तान साखळी फेरीतील तिसरा आणि अंतिम सामना श्रीलंकेविरुद्ध खेळणार आहे. हा सामना 18 सप्टेंबरला होणार आहे. अफगाणिस्तानचे उर्वरित दोन्ही सामनेही अबुधाबीतील शेख झायेद स्टेडियममध्ये होणार आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.