Nepal Gen Z Protest: नेपाळमध्ये भारतीय महिला पर्यटकाचा धक्कादायक अनुभव, हॉटेलमध्ये जमाव शिरला अन्..
Tv9 Marathi September 10, 2025 09:45 PM

Nepal Gen Z Protest: नेपाळमध्ये ‘जेन- झी’ने सरकारविरोधात सुरू केलेल्या निदर्शनांनी अधिकच उग्र स्वरुप धारण केलंय. पोखरा इथला एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला असून त्यामध्ये एक भारतीय महिला भारत सरकारकडे मदतीचं आवाहन करताना दिसतेय. उपासिता काळे असं त्या महिलेचं नाव आहे. ज्या हॉटेलमध्ये ती राहत होती, त्याला निदर्शकांनी आग लावल्याचं तिने सांगितलंय. त्यावेळी उपासिता स्पा मध्ये होती आणि नंतर काठ्या घेऊन एक जमाव तिच्या मागे धावू लागला. अखेर स्वत:चा जीव वाचवण्यासाठी ती तिथून पळाली. व्हॉलीबॉल लीग आयोजित करण्यासाठी उपासिता नेपाळमध्ये गेली होती.

या व्हिडीओमध्ये ती सांगते, “माझं नाव उपासिता काळे आहे आणि मी हा व्हिडीओ प्रफुल्ल गर्ग यांना पाठवतेय. मी भारतीय दूतावासालाही विनंती करते की कृपया आमची मदत करा. ज्यांना कोणाला शक्य असेल त्यांनी कृपया मदत करा. मी नेपाळमधील पोखरा इथं अडकले आहे. इथं मी व्हॉलीबॉल लीग आयोजित करण्यासाठी आली होती. सध्या मी ज्या हॉटेलमध्ये राहत होते, ते जळून खाक झालं आहे. माझं सर्व सामान माझ्या हॉटेल रुममध्ये होतं. मी स्पा मध्ये होते आणि लोक अचानक माझ्या मागे काठ्या घेऊन धावत होते. कसंबसं मी माझा जीव वाचवून पळाले.”

नेपाळचेपंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी राजीनामा दिला. निदर्शकांचा संताप इतका अधिक होता की, त्यांनी पार्लमेंटसह अनेक महत्त्वाच्या इमारतींची जाळपोळ केली. दरम्यान, भारताने नेपाळमधील आपल्या नागरिकांना खबरदारी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. सोमवारी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात 19 जणांचा मृत्यू झाला आणि किमान 300 जण जखमी झाले. निदर्शकांनी पर्यटकांनाही सोडलं नाही, असं उपासिताने म्हटलंय.

View this post on Instagram

A post shared by Prafful Garg (@praffulgarg)

“इथली परिस्थिती खूप वाईट आहे. रस्त्यावर जागोजागी आगी लावल्या जात आहेत. ते पर्यटकांनाही सोडत नाहीयेत. त्यांना कोणाचीच पर्वा नाही. ते कसलाच विचार न करता सर्वत्र आग लावत आहेत. मी भारतीय दूतावासांना विनंती करते की कृपया हा व्हिडीओ भारत सरकारपर्यंत पोहोचवावा. मी हात जोडून विनंती करते की कृपया आमची मदत करा. माझ्यासोबत इथं बरेच लोक आहेत आणि आम्ही सर्वजण इथे अडकलो आहोत”, अशी विनंती तिने केली आहे.

दरम्यान, काठमांडूमधील भारतीय दूतावासाने नेपाळमधील सर्व नागरिकांना परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत तिथं प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे. त्याचप्रमाणे आपत्कालीन परिस्थितीत मदतीची आवश्यकता असलेल्यांसाठी आपत्कालीन संपर्क क्रमांकसुद्धा जारी केला आहे.

काठमांडू इथला भारतीय दूतावासातील दूरध्वनी क्रमांक: 977 – 980 860 2881, 977 – 981 032 6134 (व्हॉट्सॲप कॉलही करू शकता.)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.