शेती हा आतबट्ट्याचा व्यवसाय म्हणून ओळखल्या जातो. शेतीत धाडसी प्रयोग करायला अनेक जण धजत नाहीत. पण हा तरुण त्याला अपवाद ठरला. त्याने 8 लाख वार्षिक पगार असलेली नोकरी सोडली आणि शेतीत विविध प्रयोग केले. सुरूवातीला अपयश आलं. पण त्याने तो खचला नाही. बाजाराचा नीट अभ्यास केल्यानंतर शेतात त्याने काही पिकांचं उत्पादन घ्यायला सुरुवात केली. आज तो वार्षिक 24 लाखांची कमाई करत आहे. त्याने गावातील 25 जणांना रोजगारही दिला आहे.
विनित पटेलचा अनोखा प्रयोग
मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्हातील परसवाडा तहसील अंतर्गत अरंडिया हे गाव आहे. येथील विनीत पटेल हा तरुण इंजिनिअर म्हणून नोकरी करत होता. वार्षिक 8 लाखांचा पगार होता. पण त्याचे या नोकरीत मन लागेना. मग त्याने नोकरीला रामराम ठोकला आणि तो गावाकडे आला. त्याचे वडील संपत पटेल हे पारंपारिक शेती करत होते. धान,गव्हू आणि हरबऱ्याची शेती करण्यात येत होती. पण विनीतने नवीन प्रयोग केला. चारही हंगामात येणाऱ्या वेलवर्गीय पिकांचा प्रयोग त्याने केला. काकडी,भोपळा, कारले,दुधी भोपळा आणि इतर हंगामी पालेभाज्यांची शेती त्याने सुरू केली.
नोकरी सोडून तिप्पट कमाई
विनीत 6 एकर शेती करतो. प्रती एकर तो सध्या 4 लाखांहून अधिकची कमाई करत आहे. स्थानिक आणि इतर राज्यातील बाजारपेठेतील रोजच्या भावांची तो सकाळीच अपडेट घेतो. कोणत्या बाजार पेठेत काय भाव आहे. याचा अंदाज घेतो. त्याने अनेक ठिकाणी व्यापारी आणि भाजी विक्रेत्यांशी संपर्क ठेवला आहे. त्यामाध्यमातून त्याला चांगली किंमत मिळते. वर्षभरात आता त्याची कमाई 18 ते 24 लाखांच्या घरात पोहचली आहे.
संकरीत आणि देशी वाणाचा प्रयोग
विनीतने अगोदर शेतीचे तंज्ञ समजून घेतले. त्यानंतर त्याने बाजारपेठांचा अभ्यास केला. त्यासोबतच शेतीतज्ज्ञ, शेतकी शाळेतील विद्यार्थी, शिक्षक यांच्याशी संपर्क वाढवला. परिसरातील प्रयोगशील आणि अनुभवी शेतकऱ्यांकडून बरीच माहिती घेतली. त्यानंतर संकरीत आणि देशी वाण, त्यांची गुणवत्ता, त्यांना लागणारा खर्च, अंतरमशागत, अंतर पीक पद्धत आणि पाणी व्यवस्थापन याचा अभ्यास आणि अंमलबजावणी केली. त्यातून यश हाती आलं. यासोबतच तो आता पशूपालन करण्याचा विचार करत आहे.