Tribal Healthcare Access for Cancer Patients: कॅन्सरला हरवण्यासाठी आदिवासी भागात आधुनिक उपचारांची सुरुवात!
esakal September 11, 2025 03:45 AM

डॉ. सुशील मानधनिया डॉ. आनंद बंग

गावपातळीवरील आरोग्यव्यवस्थेला कॅन्सरबद्दल नीट माहिती असणे आवश्यक आहे, तसेच सर्वसामान्य लोकांतही जागृती महत्त्वाची आहे. जितक्या लवकर निदान होईल, तितके उपचार प्रभावी ठरतात. यासंदर्भात ग्रामीण व आदिवासी भागातील रुग्णांसाठी तयार केलेल्या नव्या प्रोटोकॉलविषयी.

गडचिरोली आणि नागपूर हा प्रवास २०० किलोमीटर आणि चार तासांचा आहे. इतका प्रवास करून गडचिरोलीतील ग्रामीण किंवा आदिवासी कॅन्सर रुग्ण किमोथेरपीसाठी दर आठवड्याला नागपूरला जाऊ शकेल का? समजा तो रुग्ण नागपूरला काही वाहनव्यवस्था करून आलाच तर रुग्णालयात त्याच्यासोबत कोण थांबणार? हा सगळा खर्च त्याला परवडणार का? आधीच कुपोषित असलेल्या या रुग्णाला किमोथेरपीचे साइड इफेक्ट सहन होतील का? मग उपाय काय? गडचिरोलीतील कॅन्सर रुग्णांचा उपचार कसा करता येईल? असे काही प्रश्न मनात घेऊन आम्ही गडचिरोलीतील सोसायटी फॉर एज्युकेशन, अॅक्शन अँड रिसर्च इन कम्युनिट हेल्थ (सर्च) या संस्थेच्या माँ दंत्तेश्वरी हॉस्पिटलमध्ये चार वर्षांपूर्वी कॅन्सरची ओपीडी सुरू केली.

इतरही बऱ्याच समस्या जाणवल्या. रुग्णालयात दाखल व्हावे लागले, तर रोजगार गमवावा लागण्याची भीती, दर आठवड्याला रुग्णालयात येणे परवडणारे नसणे. त्यामुळे तोंडावाटे देता येणाऱ्या औषधांचा, कमी खर्चाचा पण प्रभावी, आणि कमीतकमी साईड इफेक्ट अशा त्रिसूत्रींवर उपचारांचा प्रोटोकॉल निर्माण करणे गरजेचे होते. कॅन्सर उपचारांचे उपलब्ध संशोधन, प्रचलित प्रोटोकॉल याला अनुभवाची जोड देत ग्रामीण आणि आदिवासी रुग्णांसाठी कॅन्सर उपचारांचा आम्ही वेगळा प्रोटोकॉल योजू शकलो आहोत. ‘लोकल प्रॉब्लेम, लोकल सोल्युशन, ’ असा हा प्रोटोकॉल आहे.

Prostate Cancer in Young Men: तरुणांमध्ये वाढतंय प्रोस्टेट कॅन्सरचं प्रमाण? ही असू शकतात कारणं; तज्ज्ञांनी सांगितले सोपे उपाय

डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी स्थापन केलेली ‘सर्च’ ही संस्था लोकांबरोबर संशोधन करणे, महात्मा गांधींच्या तत्त्वांचा आणि कृतींचा वापर सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात करणे या माध्यमातून चार दशके काम करत आहे. ग्रामीण आणि आदिवासी लोकांच्या जीवनातील प्रत्यक्षातील अडचणी, गरजा, स्थानिक परिस्थिती विचारात घेऊन आरोग्यसेवांची योजना हे या संस्थेचे वैशिष्ट्य. या कार्याला अनुरूप असा प्रोटोकॉल वापरून चार वर्षांपासून रुग्णांना उपचार देत आहोत. यातून दोन हजार रुग्णांचा कर्करोग नियंत्रणात ठेवता आला आहे.

हा प्रोटोकॉल समजून घेण्याआधी ग्रामीण आणि आदिवासी भागात कॅन्सरची समस्या कशी आहे, ते जाणून घेऊ. तोंडाच्या कॅन्सरचे रुग्ण सर्वाधिक आढळतात. गडचिरोली जिल्ह्यातील एक लाख ग्रामीण आणि आदिवासी लोकसंख्येत ‘सर्च’ आणि टाटा कॅन्सर हॉस्पिटलने ठेवलेल्या कॅन्सर रजिस्ट्रीमध्ये असे आढळले होते की, या भागातील ५० टक्के कॅन्सर हे तोंडाचे आहेत. याचे मुख्य कारण खर्रा, तंबाखू, गुटख्याचे व्यसन हे आहे. विशेषतः खर्रा बनवताना वापरली जाणारी रसायनिक प्रक्रिया केलेली सुपारी, तंबाखू, चुना आणि याचे मिश्रण बनवण्यासाठी वापरला जाणारा प्लास्टिकचा कागद यामुळे तोंडाचा कॅन्सर जास्त प्रमाणात दिसतो. या व्यसनामुळे तोंड उघडता न येणे, तोंडात जखमा होणे, चट्टे पडणे अशा व्याधीही सामान्यरीत्या दिसतात.

शस्त्रक्रिया, किमोथेरपी आणि साईड इफेक्ट यांची भीती आणि आर्थिक कारणांमुळे रुग्ण उपचार टाळतात. कॅन्सरच्या गाठीशी छेडछाड केली तर तो बळावतो असा समज अगदी शिक्षित लोकांतही दिसतो. त्यामुळे उपचार न केल्याने तोंडाच कॅन्सर वाढल्याचे अनेक रुग्णांत दिसते.

कुपोषित रुग्णांचा प्रश्न

कॅन्सरच्या उपचारासाठी ओरल मेट्रॉनॉमिक किमोथेरपी (ओएमसीटी) हा एक नव्याने प्रचलित प्रोटोकॉल आहे. या संदर्भात काही संशोधनप्रबंध उपलब्ध आहेत. या प्रोटोकॉलचा वापर करताना आमच्या पद्धतीने काही बदल करून, येथील रुग्णांसाठी सुसंगत होईल अशा नव्या प्रोटोकॉलची निर्मिती केली आहे. वारंवार रुग्णालयात येण्याची गरज नाही, तोंडावाटे देता येतील अशी औषधे आणि साईड इफेक्ट कमीतकमी ठेवणे या तीन बाबींवर तो आधारलेला आहे. दर आठवड्याला किमोथेरपीसाठी येण्यापेक्षा ‘एक महिन्यांच्या गोळ्या द्या, आम्ही पुढच्या महिन्यात परत येतो, ’ हे रुग्णांसाठी सोईस्कर असते.

पुस्तकांतील प्रोटोकॉलनुसार १५ मिलिग्रॅम प्रतिचौरस मीटर (15 mg/m2) इतकी औषधाची मात्रा सांगितली गेली आहे. पण हे सुदृढ इंग्रज लोकांना लागू पडते. ग्रामीण भागातील रुग्णांचे वजन ४० ते ५० किलो असते, अशा कुपोषित रुग्णांचा रोजच्या जेवणाचा प्रश्न सुटलेला नसतो. अशा रुग्णांना जर जास्त डोस दिला तर रुग्ण अशरक्षः करपून जातील. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर हे रुग्ण उपचारापेक्षा साईड इफेक्टनेच दगावतील की काय अशी भीती वाटते. त्यामुळे रुग्णाची शारीरिक स्थिती आणि आरोग्य पाहून आम्ही औषधाचा डोस ठरवतो.

Explained: CAD म्हणजे काय? जाणून घ्या हृदयशस्त्रक्रियेबाबतचे ७ मोठे गैरसमज आणि सत्य

पहिल्या दोन आठवड्यात रुग्णाला ‘डोस डेन्सिटी’ करतो, म्हणजे रुग्णाला अधिक डोस देतो. त्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात डोस कमी करतो. पहिल्या आठवड्यात डोस अधिक असल्याने प्रतिसादही चांगला मिळतो. पुढील तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात अस्थिमज्जावर (बोनमॅरो) साईड इफेक्टची वेळ येते तेव्हा आम्ही डोस कमी करतो. त्यामुळे अस्थिमज्जा पूर्ववत व्हायला मदत होते. त्यातून चांगले उपचार आणि कमीतकमी साईड इफेक्ट शक्य झाले आहे.

नव्या प्रोटोकॉलची गरज का?

सायटोटॉक्सिन द्यायचे की नाही, औषधांचा डोस रुग्ण सहन करेल का याचा अंदाज येण्यासाठी क्रियाटिनीन पाहाणे, पेंटेप्रेझॉल द्यायचे का नाही द्यायचे, हे कॅन्सर उपचारांच्या मार्गदर्शन तत्त्वांत कोठेही लिहिलेले नाही. पण आम्ही याचा विचार करतो. डोस, डोसच्या वेळा, किती प्रकारची औषधे अशा बाबी आम्ही स्वतः ठरवल्या आहेत. रुग्णांची शारीरिक स्थिती लक्षात घेऊन ‘मिथोट्रिक्सेट ’चे डोस बदलले आहेत. काही वर्षांचा अनुभव यांकामी आला आहे.

तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे होणाऱ्या तोंडाच्या कॅन्सरचे प्रमाणही आपल्याकडे जास्त दिसते. इतर देशांत तंबाखूचे सेवन धुम्रपानावाटे होते, त्यामुळे त्यांच्या समस्या वेगळ्या आहेत. आम्ही आपल्याकडील समस्यांच्या दृष्टीने विचार केला. भारतात कॅन्सर रुग्णांसंदर्भात वास्तव आकडेवारी उपलब्ध नाही, ही वस्तुस्थिती आहे.

देशातील जिल्ह्यांची संख्या ८००चे वर आहे, तर लोकसंख्येवर आधारित कॅन्सर रजिस्ट्रींची संख्या फक्त ३८ आहे. उर्वरित जिल्ह्यांची आकडेवारी आपल्याकडे उपलब्ध नाही. आपल्याकडे अधिकृतरीत्या कॅन्सर रुग्णांची जी आकडेवारी सांगितली जाते, त्यापेक्षा किमान चारपट रुग्णांची संख्या जास्त असेल, असा अंदाज आहे. पण सरकारसह आपण सर्व डोळे बंद करून बसलो आहोत. आमचा प्रोटोकॉल हा ग्रामीण आणि आदिवासी भागातील रुग्णांना चांगल्यारीतीने जगण्यास साह्यभूत ठरणार आहे.

कॅन्सरसंदर्भात जी समस्या गडचिरोलीतील आहे, तीच समस्या छत्तीसगड किंवा ओडिशातील जंगलात, ग्रामीण भागात राहाणाऱ्या लोकांची असू शकते. त्यामुळे ग्रामीण, आदिवासी भागातील रुग्णांच्या गरजा लक्षात घेऊन नव्याने उपचाराचे प्रोटोकॉल ठरवावे लागतील. आम्ही ज्या पद्धतीने काम करतो, तो प्रोटोकॉल आठ दिवसांच्या प्रशिक्षणाने शिकता येण्यासारखा आहे.

कॅन्सरविरोधातील त्रिसूत्री

कॅन्सरविरोधात जनजागृती, लवकरात लवकर निदान आणि योग्य उपचार अशा तीन पातळ्यांवर लढाई करावी लागणार आहे. यात सरकार, ग्रामीण रुग्णालये, स्वयंसेवी संस्था, जनरल प्रॅक्टिशनर, कॅन्सरतज्ज्ञ या सर्व घटकांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. ग्रामीण भागात जर एखाद्या महिलेला स्तनात गाठ असेल तरी ती त्वरित कॅन्सरतज्ज्ञाकडे जाणार नाही, तिचा पहिला संपर्क हा गावातील स्थानिक डॉक्टर, प्राथमिक आरोग्यकेंद्र किंवा आरोग्यसेवकही असणार आहे.

स्तनातील गाठ दुधाची आहे, असे समजून उपचार होत राहिले किंवा घशातील गाठ टीबीची समजून उपचार होत राहिले, आणि नंतर कॅन्सर निष्पन्न झाला तर उपचारात होणारा विलंब हा नुकसानकारक ठरू शकतो. त्यामुळे गावपातळीवरील आरोग्यव्यवस्थेला कॅन्सरबद्दल नीट माहिती असणे आवश्यक आहे. तसेच सर्वसामान्य लोकांतही जागृती महत्त्वाची आहे. जितक्या लवकर निदान होईल, तितके उपचार प्रभावी ठरतात. अर्थात भीतीचे वातावरणही निर्माण होऊ नये, याची काळजी घ्यावी लागेल.

Spinal Health Alert: हातातील अशक्तपणा किंवा सुन्नपणा दुर्लक्षित करू नका! असू शकतात पाठीच्या कण्यातील आजाराचे गंभीर संकेत

गडचिरोली जिल्ह्यात यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स आणि ‘सर्च’द्वारे ‘मुक्तिपथ’ हे जिल्हाव्यापी अभियान विविध व्यसनांविरोधात कार्यरत आहे. तंबाखू, गुटखा, खर्रा, मावा यांचे सेवन थांबवणे यासाठी जनजागृती आवश्यक आहे.

(डॉ. मानधनिया कॅन्सरतज्ज्ञ आहेत, तर डॉ. बंग ‘सर्च’चे सहसंचालक आहेत.)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.