अभिषेक शर्मा याने केलेल्या स्फोटक बॅटिंगच्या जोरावर भारतीय संघाने आशिया कप 2025 स्पर्धेत विजयी सलामी दिली आहे. भारताने यूएई अर्थात संयुक्त अरब अमिराती संघावर 9 विकेट्सने धमाकेदार विजय मिळवला आहे. भारतीय गोलंदाजांनी यूएईला 57 धावांवर गुंडाळलं होतं. त्यामुळे भारताला 58 धावांचं सोपं आव्हान मिळालं होतं. भारताने हे विजयी आव्हान झटपट पूर्ण केलं. भारताने हे आव्हान अवघ्या 27 बॉलमध्ये 1 विकेटच्या मोबदल्यात पूर्ण केलं. भारताने 4.3 ओव्हरमध्ये 60 रन्स केल्या. अभिषेकने बॅटिंगने भारताच्या विजयात प्रमुख भूमिका बजावली. तर उपकर्णधार शुबमन गिल आणि कर्णधार सूर्यकुमार यादव या जोडीने उर्वरित धावा करत भारताला विजयापर्यंत पोहचवलं.
शुबमन आणि अभिषेक या सलामी जोडीने भारताला जोरदार सुरुवात मिळवून दिली. अभिषेकने टॉप गिअरमध्ये बॅटिंग केली. अभिषेकने चौफेर फटकेबाजी केली. मात्र याच फटकेबाजीत अभिषेक आऊट झाला. जुनैद सिद्दीकी याने अभिषेकला हैदरच्या हाती कॅच आऊट केलं. अभिषेकने 16 बॉलमध्ये 187.50 च्या स्ट्राईक रेटने 30 रन्स केल्या. विशेष म्हणजे अभिषेकने या 30 पैकी 26 धावा या चौकार आणि षटकारांच्या मदतीने केल्या. अभिषेकने या खेळीत 2 चौकार आणि 3 षटकार लगावले.
भारताने अभिषेकच्या रुपात पहिली विकेट गमावली. अभिषेकनंतर कॅप्टन सूर्यकुमार यादव मैदानात आला. सूर्याने पहिल्याच बॉलवर सिक्स ठोकला. त्यानंतर एकेरी धाव घेतली.तर शुबमन गिल यानेही फटकेबाजी करत भारताला विजय मिळवून देण्यात मोलाचं योगदान दिलं. सूर्याने 2 बॉलमध्ये नॉट आऊट 7 रन्स केल्या. तर शुबमनने 9 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह नाबाद 20 धावा केल्या.
त्याआधी कर्णधार सूर्याने टॉस जिंकून यूएईला बॅटिंगसाठी भाग पाडलं. यूएईच्या सलामी जोडीने आश्वासक सुरुवात केली. अलिशान शराफू आणि कर्णधार मुहम्मद वसीम या जोडीने 26 रन्सची पार्टनरशीप केली. मात्र जसप्रीत बुमराह याने कडक यॉर्कर टाकत ही जोडी फोडली. बुमराहने शराफू याने 22 धावा केल्या. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी यूएईला झटपट धक्के देत गुंडाळलं.
टीम इंडियाचा धमाकेदार विजय
शराफू व्यतिरिक्त मुहम्मद वसीम याने 19 रन्स केल्या. या शिवाय एकालाही भारतीय गोलंदाजांसमोर दुहेरी आकडा गाठता आला नाही. टीम इंडियासाठी कुलदीप यादव याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. कुलदीपने या 4 पैकी 3 विकेट्स एकाच ओव्हरमध्ये घेतल्या. शिवम दुबे याने तिघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्ती या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली. भारताने अशाप्रकारे यूएईचं 13.1 ओव्हरमध्ये 57 रन्सवर पॅकअप केलं.