Trimbakeshwar News : त्र्यंबकेश्वरमध्ये कालसर्प पूजेच्या नावाखाली ऑनलाइन फसवणूक
esakal September 11, 2025 02:45 AM

नाशिक: देशातील बारा ज्योतिर्लिंगांमध्ये समावेश असलेल्या त्र्यंबकेश्वर देवस्थान मंदिरात कालसर्प पूजा करण्याच्या नावाखाली भाविकांची दिशाभूल करून ‘भावनिक लूट’ केली जात आहे. अशा मोबाईल ॲप्लिकेशनवर बंदी घालण्याची मागणी त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टकडून पोलिसांकडे करण्यात आली आहे. भाविकांनी या भूलथापांना बळी न पडण्याचे आवाहन विश्वस्तांनी केले आहे.

त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी श्रावणात दररोज २० ते २५ हजार भाविक येतात. पितृपक्षात १० ते १५ हजार भाविक विविध प्रकारचे पूजाविधी करण्याच्या निमित्ताने येथे दाखल होतात. त्र्यंबकेश्वरमध्ये येणाऱ्या भाविकांना पूजाविधी कुठे करावा, पुरोहित कोण, त्यासाठी लागणारा एकूण खर्च याविषयी त्यांना फारशी माहिती नसते. याचा गैरफायदा घेऊन ऑनलाइन ॲप्लिकेशनधारक ‘एजंट’ त्यांना सर्व माहिती पुरवितात. येथील पूजाविधीची ठिकाणे अगोदर ठरलेली आहेत. जसे की, नारायण नागबलीची पूजा संगमावरच केली जाते.

अभिषेक पूजा मंदिरात, तर कालसर्प योगाची पूजा पुरोहितांच्या घरी होते. त्याला भाविकांची मान्यतादेखील आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून भाविक वर्षभर येथे येतात. मात्र, परप्रांतीय भाविकांना याविषयी फारशी माहिती नसल्यामुळे ऑनलाइन माहिती देणाऱ्या ॲप्लिकेशनच्या आधारे ते पूजाविधी करतात.

कालसर्प पूजाविधी त्र्यंबकेश्वर मंदिरात होतो, या नावाने त्यांना येथे आणले जाते. प्रत्यक्षात ही पूजा पुरोहितांच्या घरी होत असल्यामुळे त्यांच्या धार्मिक भावना दुखावतात. आम्हाला मंदिरात पूजा सांगितलेली असताना घरात पूजा का मांडण्यात आली, अशी शंका त्यांच्याकडून उपस्थित होते. त्यांची समजूत काढताना पुरोहितांची दमछाक होते. तरी भाविकांनी पूजाविधीचे ठिकाण हे अगोदर समजून घ्यावे आणि त्यानंतरच ॲप्लिकेशनधारकांवर विश्वास ठेवण्याचे आवाहन पुरोहितांनी केले आहे.

या ॲप्लिकेशनविरोधात आक्षेप

त्र्यंबकेश्वरला उज्जैन, ओंकारेश्वर, काशी, गया, दिल्ली, मध्य प्रदेश आदी राज्यांतून शेकडो भाविक दर्शनासाठी येतात. दर्शनासह पूजाविधीविषयी त्यांना माहिती देणारे ऑनलाइन ‘वामा, उत्सव, घरमंदिर, देवधाम, लाइफगुरू, ॲस्ट्रोइन्स्ट्रा’ अशा स्वरूपाचे १२ ते १५ हिंदी भाषेतील ॲप्लिकेशन वापरली जातात. त्यात त्र्यंबकेश्वर मंदिरात ‘कालसर्प’ पूजा होत असल्याचा खोटा दावा केला जातो. ज्यातून भाविकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जात असल्याने चुकीची माहिती देणाऱ्या या ॲप्लिकेशनवर बंदी घालण्याची मागणी मंदिर विश्वस्तांनी केली आहे.

मातीत राबणारेच मातीला मिळाले! महाराष्ट्रात 8 महिन्यांत तब्बल 1183 शेतकऱ्यांनी संपवलं जीवन, धक्कादायक आकडेवारी समोर...

पूजाविधी ठिकाणांचे उल्लंघन

त्र्यंबकेश्वरला येणाऱ्या भाविकांमध्ये हिंदी भाषिक भाविकांचे प्रमाण जास्त आहे. परप्रांतीय व्यक्ती या भाविकांची दिशाभूल करून पूजाविधी अज्ञातस्थळी करून मोकळे होतात. भाविकांना पूजास्थळाविषयी सखोल माहिती नसते, याचा गैरफायदा घेऊन मंदिराच्या नावाखाली अज्ञातस्थळी पूजा होत असल्याचा आरोप त्र्यंबकेश्वर मंदिराच्या विश्वस्तांनी केला आहे.

त्र्यंबकेश्वर मंदिरात कालसर्प योग पूजाविधी होत नाही. हा पूजाविधी पुरोहित आपल्या घरी करतात. तसेच इतर पूजाविधींचे ठिकाण ठरवून देण्यात आले आहे. त्याच ठिकाणी पूजा केली जाते. मात्र, त्र्यंबकेश्वर मंदिरात कालसर्प योग पूजेच्या नावाने भाविकांची दिशाभूल केली जात असल्याचा प्रकार घडला आहे. या ॲप्लिकेशनविरोधात आम्ही यापूर्वीच पोलिसांकडे तक्रार केली आहे. भाविकांनी अशा भूलथापांना बळी पडू नये.

- मनोज थेटे, अध्यक्ष, त्र्यंबकेश्वर पुरोहित संघ

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.