France Mosque Incident : धक्कादायक! नऊ मशिदींबाहेर आढळली डुकरांची मुंडकी; पाच मशिदींवर राष्ट्रपतींचं निळ्या रंगात लिहिलं नाव, मुस्लिम समाजात तीव्र संताप
esakal September 11, 2025 02:45 AM

पॅरिस : फ्रान्समध्ये (France Mosque Incident) सुरू असलेल्या राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी राजधानी पॅरिस आणि परिसरातील नऊ मशिदींच्या बाहेर डुकरांची कापलेली डोकी (मुंडकी) सापडल्याने खळबळ उडाली. त्यापैकी पाच मशिदींवर राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे नाव निळ्या रंगाने लिहिलेले होते. या कृत्यामागे नेमके कोण आहे हे स्पष्ट झालेले नसले तरी, फ्रेंच प्रशासनाने देशातील मुस्लिम समाजाला पूर्ण सुरक्षेचे आश्वासन दिले आहे.

६० लाख मुस्लिमांमध्ये संताप

फ्रान्समध्ये युरोपातील सर्वाधिक म्हणजे, तब्बल ६० लाखांहून अधिक मुस्लिम (Muslim) लोकसंख्या आहे. इस्लाम धर्मात डुकराचे मांस निषिद्ध मानले जाते. त्यामुळे या प्रकारामुळे मुस्लिम समाजामध्ये तीव्र अस्वस्थता निर्माण झाली आहे. गेल्या काही काळात फ्रान्समध्ये मुस्लिमविरोधी भावना वाढीस लागल्याचेही दिसून आले आहे.

काय म्हणाले फ्रान्सचे गृहमंत्री?

फ्रान्सचे गृहमंत्री ब्रुनो रिटेललेऊ म्हणाले, “माझी इच्छा आहे की आपल्या मुस्लिम बांधवांनी शांततेत आपला धर्म पाळावा.” दरम्यान, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी संरक्षण मंत्री सेबास्टियन लेकोर्नू यांची पंतप्रधान म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांच्यासमोर विभाजित संसदेत एकमत निर्माण करणे आणि २०२६ चा अर्थसंकल्प मंजूर करून घेण्याचे कठीण आव्हान आहे.

धर्मस्थळ मंदिर परिसरात गाडलेले 100 हून अधिक मृतदेह? 'त्या' कवटीचं गूढ अखेर उलगडलं, कट उघडकीस येण्याची शक्यता! परकीय कटाची शक्यता

पॅरिसचे पोलिस प्रमुख लॉरेंट नुनेज यांनी या घटनेमागे परकीय कट असू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली. ते म्हणाले, “देश सध्या आर्थिक आणि राजकीय संकटातून जात आहे. अशा परिस्थितीत परकीय हस्तक्षेप नाकारता येत नाही. यापूर्वीही रात्री अशा प्रकारच्या कारवाया झाल्या असून त्यामागे परकीय हात असल्याचे सिद्ध झाले आहे.”

रशियावर दाट संशय

नुनेज यांनी कोणत्याही देशाचे नाव स्पष्टपणे घेतले नाही. मात्र, त्यांचा इशारा रशियाकडे असल्याचे मानले जाते. याआधीही रशियाने फ्रान्समध्ये अस्थिरता पसरवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप झाला आहे. मे महिन्यात, ज्यू प्रार्थनास्थळे आणि होलोकॉस्ट स्मारकांवर हिरवा रंग फासण्यात आला होता. त्याप्रकरणी परकीय शक्तींशी संबंध असल्याच्या संशयावरून तीन सर्बियन नागरिकांना अटक करण्यात आली होती.

पॅरिस अभियोक्ता कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, राजधानीतील चार मशिदी आणि राजधानीबाहेरील पाच मशिदींमध्ये डुकरांची मुंडकी ठेवलेली आढळली. एका मशिदीवर राष्ट्रपती मॅक्रॉन यांचे आडनाव निळ्या रंगात लिहिलेले होते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.