टीम इंडियाने टी 20 आशिया कप 2025 स्पर्धेत यूएईवर 9 विकेट्सने विजय मिळवला. भारताने यासह आशिया कप 2025 स्पर्धेत विजयी सुरुवात केली. सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात भारताने धमाकेदार विजय मिळवला. यूएईने विजयासाठी दिलेलं 58 धावांचं आव्हान भारताने अवघ्या 4.3 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून सहज पूर्ण केलं. भारताच्या या विजयात 3 खेळाडूंनी प्रमुख भूमिका बजावली. या 3 खेळाडूंमध्ये 1 फिरकीपटू, 1 ऑलराउंडर आणि 1 फलंदाज आहे. या तिघांबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
चायनामन बॉलर कुलदीप यादव, ऑलराउंडर शिवम दुबे आणि ओपनर बॅट्समन अभिषेक शर्मा या तिघांनी भारतीय संघाला विजयी करण्यात प्रमुख भूमिका बजावली. भारतीय गोलंदाजांनी यूएईचं 57 धावांवर पॅकअप केलं. त्यानंतर भारताने 27 चेंडूत 1 विकेट गमावून 60 धावा केल्या आणि विजय मिळवला.
अभिषेक शर्मा आणि उपकर्णधार शुबमन गिल या दोघांनी भारताला वादळी सुरुवात करुन दिली. या दोघांनी 48 धावांची सलामी भागदारी केली. यात अभिषेकचं सर्वाधिक 30 धावांचं योगदान राहिलं. अभिषेकने 16 चेंडूंमध्ये 2 चौकार आणि 3 षटकारांसह 30 धावा केल्या. अभिषेक व्यतिरिक्त शुबमनने 20 आणि कॅप्टन सूर्याने 7 धावा जोडल्या.
यूएईच्या सलामी जोडीने काही वेळ मैदानात घालवला. अलीशान शराफू आणि कॅप्टन मुहम्मद वसीम या दोघांनी 26 रन्सची ओपनिंग पार्टनरशीप केली. मात्र यूएईने अलीशान याच्या रुपात पहिली विकेट गमावली. त्यानंतर यूएईचा डाव गडगडला. यूएईसाठी अलीशान व्यतिरिक्त कॅप्टन वसीम याने 19 धावा जोडल्या.तर इतरांनी भारतीय गोलंदाजांसमोर गुडघे टेकले. दोघांशिवाय एकालाही दुहेरी आकडा गाठता आला नाही. यूएईला पूर्ण 20 ओव्हरही खेळता आलं नाही. यूएईचा डाव 57 धावांवर आटोपला. यूएईची टी 20I क्रिकेटमधील ही सर्वात निच्चांकी धावसंख्या ठरली.
यूएईला 57 धावांवर गुंडाळण्यात कुलदीप यादव आणि शिवम दुबे या दोघांनी प्रमुख भूमिका बजावली. कुलदीप यादव याने सर्वाधिक 4 विकेट्स मिळवल्या. कुलदीपने या 4 पैकी 3 विकेट्स एकाच ओव्हरमध्ये घेतल्या. कुलदीपने अवघ्या 2.1 ओव्हरमध्ये 7 धावांच्या मोबदल्यात या 4 विकेट्स मिळवल्या.
कुलदीप व्यतिरिक्त शिवम दुबे यानेही कमाल केली. शिवमने यूएईच्या तिघांना आऊट केलं. तर इतर 3 फलंदाजांनी 1-1 विकेट मिळवली. जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.