भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआय ही जगातील श्रीमंत क्रिकेट बोर्ड गणलं जाते. त्यामुळे या संस्थेचा अध्यक्ष असणं ही मानाची बाब आहे. अनेक दिग्गजांनी हे पद भूषवलं आहे. 1983 च्या वर्ल्डकप विजेत्या संघाचे सदस्य रॉजर बिन्नी शेवटचे अध्यक्ष होते. वयाची 70 वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांनी हे पद सोडलं. बिन्नी यांनी 2022 साली या पदाचा कार्यभार सांभाळला होता. जवळपास तीन वर्षे त्यांनी ही भूमिका बजावली. आता त्यांच्या नवा अध्यक्ष कोण याची चर्चा रंगली आहे. कारण बीसीसीआयच्या अध्यक्ष हा क्रिकेटपटूच असेल स्पष्ट आहे. त्यामुळे क्रिकेटपटूच्या नावाची चर्चा रंगली. काही रिपोर्टनुसार, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर या पदावर विराजमान होईल असं सांगण्यात येत होतं. पण सचिन तेंडुलकरने एका झटक्यात या चर्चांना पूर्णविराम लावला आहे. तसेच या चर्चा निव्वल अफवा असल्याचं सांगितलं आहे.
सचिन तेंडुलकरची मॅनेजमेंट कंपनीने एक निवेदन देत स्पष्ट केलं की, ‘आम्हाला कळलं की सचिन तेंडुलकर यांचं नाव बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी चर्चेत आहे तसेच त्यांच्या नावाचा विचार केला जात असल्याच्या बातम्या आणि अफवा समोर येत आहेत. पण आम्ही स्पष्ट करतो की, असं काहीच नाही. आम्ही संबंधित चर्चा निराधार असल्याचं स्पष्ट करतो आणि त्याकडे लक्ष देऊ नका अशी विनंती करतो.’ दरम्यान, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आपल्या पुढील अध्यक्ष म्हणून एका मोठ्या भारतीय क्रिकेटपटूच्या शोधात आहे. सध्या राजीव शुक्ला हे तीन महिन्यांसाठी कार्यवाहक अध्यक्ष आहेत.
सौरव गांगुली आणि रॉजर बिन्नी यासारख्या दिग्गज क्रिकेटपटूंनी हे पद भूषवलं आहे. त्यामुळे असंच मोठं नाव पुढे येईल अशी अपेक्षा क्रीडाप्रेमी करत आहेत. बीसीसीआयच्या अनेक भागधारकांना नवीन अध्यक्ष हा भारतीय क्रिकेटमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणारा माजी क्रिकेटपटू असावा असे वाटते. भारतीय संघातून निवृत्त झालेल्या दिग्गज खेळाडूचा यासाठी विचार होईल यात काही शंका नाही. सप्टेंबर 2025 च्या अखेरीस होणाऱ्या बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नवीन अध्यक्षाची निवड हा एक प्रमुख मुद्दा असेल.