दुलीप ट्रॉफी 2025 स्पर्धेचा अंतिम सामना बंगळुरुच्या बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सीलेंस ग्राउंडमध्ये खेळला जात आहे. या सामन्यात सेंट्रल झोन आणि साउथ झोन हे संघ आमनेसामने आले आहेत. या सामन्यातील पहिल्याच दिवस सेंट्रल झोनने गाजवला. त्यामुळे पहिल्या दिवशी साउथ झोन पूर्णपणे बॅकफूटवर गेला आहे. या सामन्यात 32 वर्षीय फिरकीपटून सारांश जैनने साउथ झोनचा निम्मा संघ तंबूत पाठवला. त्यामुळे त्याच्या नावाची पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. सारांश जैनने 24 षटकात 49 धावा देत 5 विकेट घेतल्या. त्याच्या या भेदक गोलंदाजीमुळे साउथ झोनचा संघ 149 धावांवरच सर्वबाद झाला. तर पहिल्या दिवसअखेर सेंट्रल झोनने विनाबाद 50 धावा केल्या आहेत. चला जाणून घेऊयात सारांश जैन कोण आहे?
सारांश जैन हा इंदुरचा असून मध्य प्रदेशच्या रणजी संघातील खेळाडू आहे. अष्टपैलू सारांश जैनने 43 फर्स्ट क्लास सामने खेळले असून आतापर्यंत 139 विकेट घेतल्या आहेत. तर लिस्ट ए सामन्यात त्याच्या नावावर 31 आणि 18 विकेट आहेत. सारांशचे वडील सुबोध जैन हे मध्य प्रदेशसाठी रणजी ट्रॉफी खेळले आहेत. त्यांच्याकडून क्रिकेटचे धडे गिरवून सारांशने क्रिकेटमध्ये करिअर करण्याच निर्णय घेतला. पण वडिलांच्या एका मेसेजमुळे त्याचं आयुष्य पालटलं. कारण 2014 साली तसंच काहीसं घडलं होतं. 2014 मध्ये रणजी ट्रॉफीत सारांश जैनने पदार्पण केलं होतं. तसेच मध्य प्रदेशातील एका क्लब संघासोबत पाच सामन्यांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाला गेला होता.
सारांश जैन ऑस्ट्रेलियात असताना घरून फोन येत नव्हते. यामुळे सारांश नाराज झाला होता. दौऱ्यावरून परतल्यानंतर सारांश जेव्हा घरी आला तेव्हा त्याला धक्का बसला. कारण वडील बेडवर पडले होते आणि त्यांच्या चेहऱ्याचं ऑपरेशन झालं होतं. सुबोध जैन यांना कर्करोग झाला होता. त्यांनी सारांश जैनला एक चिठ्ठी लिहिली आणि त्यात मेसेज लिहिला होता की, ‘बेटा, मी आता ठीक आहे. जर तू चांगला खेळलास तर मी लवकरच बरा होईन.’ सारांशने वडिलांची ही आठवण अजूनही जपून ठेवली असून हेच त्याच्या यशाचं रहस्य आहे.