Public Security Bill: साताऱ्यात महाविकास आघाडी आक्रमक! 'जनसुरक्षा विधेयकाची होळी करत केंद्र सरकारचा निषेध',कायदा जनतेची मुस्कटदाबी करणारा
esakal September 12, 2025 08:45 AM

सातारा: केंद्राने आणलेल्या जनसुरक्षा विधेयकाला विरोध करण्यासाठी महाविकास आघाडीतील घटक पक्ष व संघटनांनी आज राज्यव्यापी निषेध आंदोलनाची हाक दिली होती. त्या पार्श्वभूमीवर येथील पोवई नाक्यावर महाविकास आघाडीतील घटक पक्ष व संघटनांनी जनसुरक्षा विधेयकाच्या पत्रकांची होळी करत केंद्र सरकारचा निषेध नोंदवला. दरम्यान, हे विधेयक मंजूर करण्याच्या प्रयत्न केंद्र सरकारने केल्यास महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही. त्याची पहिली ठिणगी प्रतिसरकार असलेल्या साताऱ्यातून पडेल, असा इशारा डॉ. भारत पाटणकर यांनी दिला.

या वेळी आंदोलनकर्त्यांनी संविधान विरोधी सरकारचा धिक्कार असो, फडणवीस तुमचे करायचे काय.. खाली मुंडी वर पाय.., मोदी सरकारचा निषेध असो, महाविकास आघाडीचा विजय असो, जनसुरक्षा विरोधी कृती समितीचा विजय असो, शिवसेना झिंदाबाद, अशी घोषणाबाजी करत केंद्र सरकारचा निषेध नोंदवला. या वेळी जनसुरक्षा विधेयकाच्या पत्रकाची होळी करण्यात आली. यानंतर डॉ. भारत पाटणकर म्हणाले, ‘‘जनसुरक्षा कायदा हा जनतेची मुस्कटदाबी करणारा असून, याविरोधात महाविकास आघाडीने निदर्शने केली आहेत.

राज्यव्यापी आंदोलने होत असून, ४४ ठिकाणी आंदोलने झाली आहेत. या माध्यमातून महाराष्ट्रातून आंदोलनाच्या मशाली पेटल्या आहेत. कृती समितीच्या वतीने आम्ही केंद्राला सांगू इच्छितो, की हा कायदा मंजूर करण्याच्या प्रयत्न केल्यास महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही. त्याची पहिली ठिणगी प्रतिसरकार असलेल्या साताऱ्यातून पडेल. आम्ही हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरून आंदोलन करून या सरकारला सत्ता सोडून पळून जावे लागेल.’’

या आंदोलनात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील, साहिल शिंदे, समिंद्रा जाधव, संजना जगदाळे, अर्चना देशमुख, अतुल शिंदे, गोरखनाथ नलावडे, दिलीप बाबर, सुभाष कारंडे, घनश्याम शिंदे, सचिन जाधव, विजय बोबडे, शफीक शेख, अमोल पाटोळे, किरण चौधरी, सागर झणझणे, संतोष पवार, वैशाली जाधव, तेजस्विनी केसरकर, युवराज पवार, मंगेश ढाणे, प्रथमेश पवार, कॉँग्रेसचे राजेंद्र शेलार, बाबूराव शिंदे, मनोहर शिंदे, नरेश देसाई, ॲड. दत्तात्रेय धनावडे, सुषमा राजेघोरपडे,

अल्पना यादव, रजनी पवार, रजिया शेख, मनीषा साळुंखे, अशोक पाटील, अन्वर पाशा खान, मनोजकुमार तपासे, संदीप माने, राजेंद्र पाडळे. श्रमिक मुक्ती दलाचे डॉ. भारत पाटणकर, ॲड. शरद जांभळे, शेकापचे ॲड. समीर देसाई, सीपीआयचे माणिक अवघडे, आनंदी अवघडे, अस्लम तडसरकर, विजय निकम, श्याम चिंचणे, आम आदमीचे निवृत्ती शिंदे, विवेक कुराडे, अब्बास शिकलगार, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे गणेश अहिवळे, सुमीत नाईक, बाळासाहेब शिंदे, सागर धोत्रे, प्रणव सावंत, राहुल जाधव, रमेश बोराटे आदी उपस्थित होते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.