Solapur Rain Update: साेलापूरवर आभाळ फाटले! 'जिल्ह्यातील ९१ पैकी १३ मंडलांत अतिवृष्टी'; शेळगीत ५ तासांत ५ इंच कोसळला पाऊस
esakal September 13, 2025 12:45 AM

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील १३ महसूल मंडलांत गुरुवारी रात्री २ ते सकाळी ७ पर्यंत मुसळधार पाऊस झाला. अवघ्या पाच तासात या पावसाने होत्याचे नव्हते केले. खरिपांच्या पिकांची शेतात असलेली रास मातीमोल झाल्याने या पावसाने शेतकरी कुटुंबाच्या डोळ्यात अक्षरश: पाणी आणले आहे. वागदरी, शेळगी, वळसंग, होटगी, अक्कलकोट, चपळगाव आणि किणी या सात महसूल मंडळात अवघ्या पाच तासांत १०० मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस झाला आहे.

आनंदाची बातमी! 'गायीच्या दूध दरात तीन रुपयांपर्यंत वाढ'; सातारा जिल्ह्यात सुमारे ५५ हजार दूध उत्पादकांना दिलासा

सध्या सुरू असलेल्या पूर्वा नक्षत्रातील पावसाने अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर तालुका आणि सोलापूर शहराला जोरदार झोडपले आहे. रात्रीपासून विजांच्या कडकडाटात सूरू झालेल्या पावसाने जनजीवन विस्कळित झाले. खरिपाच्या पिकांचा हातातोंडाशी आलेला घास या पावसाने हिरावून घेतला आहे. सोलापूर शहरातील विडी घरकूल, शेळगी, अक्कलकोट रोड, अवंतीनगर, देगाव या भागात पावसाचे पाणी शिरल्याने अनेकांचा संसार उघड्यावर पडला आहे.

जिल्ह्यात आज सकाळी ८ पर्यंत सरासरी २८.३ मिलिमीटर पाऊस झाला आहे. अक्कलकोट तालुक्याची सप्टेंबरच्या पावसाची सरासरी १७३.९ मिलिमीटर एवढी आहे. अक्कलकोट तालुक्यात पाच तासातच सरासरी ९६.२ मिलिमीटर पाऊस झाला आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यात सरासरी ६८.८ मिलिमीटर तर उत्तर सोलापूर तालुक्यात सरासरी ६४.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. आज दिवसभर ढगाळ वातावरण होते. पुढील पाच दिवस सोलापूर शहर व परिसरात मध्यम पाऊस राहील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

मंडलांतील शाळांना सुट्टी

सोलापूर : शहरातील शेळगीसह ग्रामीणमधील मार्डी, बोरामणी, वळसंग, होटगी, मंद्रूप, मुस्ती, निंबर्गी, अक्कलकोट, जेऊर, तडवळ, करजगी, दुधनी, मैंदर्गी, चपळगाव, किणी, नरखेड, म्हैसगाव व सोनंद या महसूल मंडलांमध्ये मोठा पाऊस झाला. त्यामुळे या भागातील गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शाळेला बोलावू नये, अशा सूचना केल्या आहेत.

Smart Meter: मीटरचा हिशोब ‘स्मार्ट’ की फसवा?; वाढीव वीजबिलांमुळे ग्राहक संतप्त, दुरुस्तीसाठी महावितरण कार्यालयात रांगा

गुरुवारी (ता. ११) पहाटेच्या सुमारास सोलापूर शहर-ग्रामीणमध्ये मुसळधार पाऊस झाला. त्यात २० महसूल मंडलांमध्ये अन्य मंडलांच्या तुलनेत अधिक पाऊस पडला. शहरातील विडी घरकूल, शेळगी, दहिटणे भागातील काही शाळा गुरुवारी बंद राहिल्या. काही शाळांसमोर पाण्याचा डोह साचला होता तर संभाजीराव शिंदे शाळेच्या वर्गखोल्यात पाणी शिरले होते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.