पिंपरी, ता. १२ : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या वतीने सांगवी गावठाण येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ३५० हून अधिक नागरिकांनी विविध तपासण्यांचा लाभ घेतला. यावेळी शंभरहून अधिक नागरिकांना आयुष्मान कार्ड तयार करून देण्यात आले.
शिबिराचे उद्घाटन महापालिकेच्या सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. अंजली ढोणे यांच्या हस्ते, माजी महापौर माई ढोरे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. तृप्ती सागळे, नोडल अधिकारी डॉ. वैशाली भामरे, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. प्रज्ञा बडगे, फिजिशियन डॉ. देवयानी लोंढे, बालरोगतज्ज्ञ डॉ. दीपक पाटील उपस्थित होते.
या शिबिरामध्ये दंत तपासणी, नेत्र तपासणी, कान-नाक-घसा तपासणी, बालकांची व किशोरवयीन मुलांची तपासणी, गर्भवती महिलांची तपासणी, ज्येष्ठ नागरिकांची तपासणी, मानसिक आरोग्य तपासणी, लहान मुलांचे लसीकरण, रक्त तपासणी तसेच औषधांचे वितरण अशा सर्व सेवा मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. याशिवाय नागरिकांना आयुष्मान कार्डे व आभा कार्डे काढून देण्यात आले. भूलरोगतज्ज्ञ डॉ. मोनाली क्षीरसागर यांनी उपस्थितांना सीपीआरचे प्रात्यक्षिक करून आवश्यक ते मार्गदर्शन केले.
शिबिरामध्ये नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी, तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन आणि जनजागृती उपक्रम याद्वारे नागरिकांना सर्वसमावेशक सेवा देणे हा महापालिकेचा प्रयत्न आहे. अशा शिबिरामुळे नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यास मोठी मदत मिळते, असे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी सांगितले.