उंडवडी, ता. १२ : राज्यात गोवंश हत्या बंदीनंतर गाईंच्या नर वासरांचा (खोंडांचा) प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. खोंडांचा सांभाळ शेतकऱ्यांना परवडेनासा झाल्याने ते माळरानावर, निर्जन ठिकाणी किंवा वनक्षेत्रात सोडले जात असल्याचे चित्र बारामतीसह इतर तालुक्यांत सर्रास पाहाव्यास मिळत आहे. मात्र, या असहाय खोंडांवर मोकाट कुत्र्यांचे हल्ले होत असून त्यांचा अकाली मृत्युमुखी पडत आहेत. त्यामुळे एका बाजूला खोंड आणि दुसऱ्या बाजूला मोकाट कुत्र्यांमुळे होणारी डोकेदुखी वाढू लागली आहे.
खोंडांच्या मृत्यूच्या घटनांमुळे केवळ शेतकरीच नव्हे तर गावकरी देखील भयभीत झाले आहेत. “गोवंश वाचविण्याचा कायदा झाला, पण खोंडांचे भवितव्य मात्र अंधारात” अशी शेतकऱ्यांची भावना आहे. नर खोंडांचा कसलाही उपयोग नसल्याने त्यांच्या संगोपनासाठी लागणारा चारा ,पशुखाद्य व औषधांचा खर्च प्रचंड वाढतो. बहुसंख्य गाई जर्सी जातीच्या असल्याने त्यांची नर खोंडं बैल म्हणूनही उपयोगी पडत नाहीत. शेतीत बैलांचे स्थान ट्रॅक्टरने घेतल्याने त्यांची गरजच उरली नाही. यामुळे खोंडांच्या संगोपनासाठी स्वतंत्र योजना, गोशाळा, गोसंवर्धन केंद्रे उभारणे अत्यावश्यक गरजेचे आहे. खोंडांना शेतकरी कोठेही सोडून देत आहेत. त्याची शिकार मोकाट कुत्र्यांकडून होत आहे.
“गोवंश वाचविण्याचा कायदा झाला खरा, पण खोंडांचा प्रश्न न सुटल्यास ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी ही समस्या आणखी भीषण ठरणार आहे,” अशी शेतकरी व नागरिकांकडून शासनाकडे आर्त मागणी केली जात आहे.
डोळ्यासमोर खोंडांना कुत्रे फाडताना पाहणं फार वेदनादायक आहे. पण त्यांना जगवणं आमच्यासाठी अशक्य झालं आहे. खोंडांचा खर्च वाढतोय, उत्पन्न मात्र काहीच नाही. शासनाने तातडीने उपाययोजना केली नाही, तर प्रश्न अधिक बिकट होईल.
- दत्तात्रेय खराडे, शेतकरी, खराडेवाडी
शासनाने वांझ व खोंड सांभाळण्यासाठी अनुदान द्यावे. याकामी दर तीन महिन्याला गोट्याची पाहणी करुन असे पशुधन सांभाळण्यासाठी शेतक-यांना मदत करावी.
- सतीश गवळी, शेतकरी, उंडवडी सुपे
02956