पिंपरी : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) बससाठी उभारण्यात आलेल्या ‘बीआरटी’ (बस रॅपिड ट्रान्झिट) मार्गिका आणि स्थानकांची देखभाल-दुरुस्ती कोणी करायची? यावरून महापालिका आणि पीएमपीएमएल प्रशासन एकमेकांकडे बोट दाखवित आहेत. समन्वयाअभावी बीआरटी मार्गिकेचे काम रखडले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून ‘पीएमपी’ बससाठी ‘बीआरटी’ मार्गिका बांधल्या. पण, त्यातील थांब्यांची दुरवस्था झाली आहे. त्याची दुरुस्ती कोणी करायची, यासाठी दोन्ही प्रशासनांत ‘तू-तू-मैं-मैं’ सुरू आहे. ‘‘सुरुवातीला पायाभूत सुविधा उभारणे हे आमचे काम आहे. बीआरटी स्थानके ‘पीएमपी’कडे हस्तांतरित केले आहेत. त्यामुळे स्वच्छता, देखभाल-दुरुस्ती हे ‘पीएमपी’चे काम आहे.
त्यांनी सुरक्षा रक्षक काढल्यामुळे बीआरटी स्थानकातील वस्तू चोरीला गेल्या आहेत. त्यामुळे दुरवस्थेला तेच जबाबदार आहेत. आम्ही त्यांना दरवर्षी तुटीपोटी कोट्यवधी रुपये देतो. त्यामुळे ही देखभाल-दुरुस्ती ‘पीएमपी’ने करणे आवश्यक आहे,’’ असा दावा महापालिका सहशहर अभियंता माणिक चव्हाण यांनी केला. तर, ‘‘बीआरटी स्थानके ही महापालिकेची संपत्ती आहे. त्याची देखभाल-दुरुस्तीचे काम त्यांचे आहे,’’ असा दावा ‘पीएमपीएमएल’ प्रशासन करत आहे.
बीआरटी थांब्यांतील समस्या
बहुतांश थांब्यांतील दिवे बंद
प्रवाशांना अंधारातच थांबतात
सुरक्षारक्षकांच्या केबिन दरवाजांची चोरी
एलईडी माहिती फलक, स्वयंचलित दरवाजांची चोरी
अपघात टाळण्यासाठी बसविलेले रोलर तुटलेले
छत, बाके, बॅरिकेड्सचे लोखंडी अडथळे तुटले
आकडे बोलतात
५२ कि.मी. :
बीआरटी मार्गिकांची लांबी
४११ : दररोज धावणाऱ्या बस
२.५ लाख : दररोज
सरासरी प्रवासी
४,७३६ : बसफेऱ्या
शहरातील बीआरटी मार्ग
१ निगडी-दापोडी
२ सांगवी फाटा-किवळे
३ नाशिक फाटा-वाकड
४ काळेवाडी फाटा-चिखली
५ दिघी-आळंदी फाटा
बीआरटी स्थानकांच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी दोन्ही महापालिकांची आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही महापालिका पीएमपीएमएलला संचलन तूट देतात.
- सतीश गव्हाणे, मुख्य वाहतूक व्यवस्थापक, पीएमपीएमएल