लोटे एमआयडीसीत दोन दिवसांनी पाणी
पाइपलाइन फुटल्याने अडचण ; ११ गावांना घ्यावे लागले विकत
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १२ : लोटे (ता. खेड) औद्योगिक वसाहतीसह परिसराला पाणीपुरवठा करणारी एमआयडीसीची पाइपलाइन सोमवारी (ता. ८) रात्री १० वाजण्याच्या सुमारास पेढे-फरशीतिठा येथे फुटली होती. बुधवारी (ता. १०) सायंकाळी ही पाइपलाइन दुरुस्त झाल्यानंतर लोटे एमआयडीसीसह परिसरातील गावांचा पाणीपुरवठा सुरळीत झाला.
सोमवारी रात्री १०च्या सुमारास पाइपलाइन फुटली. पाण्याच्या उच्चदाबामुळे हवेत सुमारे २० ते २५ फूट उंच पाण्याचा फवारा उडाला. परिणामी, तेथे लागूनच असलेल्या नरेंद्र माळी यांच्या दुकानाचे साडेसहा लाखांचे तर राकेश गडदे यांच्या दुकानातील फ्रिज व प्रिंटर पाण्याने भिजून नुकसान झाले. माळी यांच्या दुकानात पाणी जाऊन आतील साहित्याची मोठी नासधूस झाली. मंडल अधिकारी उमेश राजेशिर्के, तलाठी विजया मिटकर यांनी सुमारे ७ लाख नुकसानीचा पंचनामा केला. सोमवारी रात्री फुटलेल्या पाइपलाइनच्या दुरुस्तीचे काम मंगळवारी सकाळी हाती घेण्यात आले. त्यासाठी एमआयडीसीने २४ तासांचा ब्रेकडाऊन घेतला होता. त्यामुळे दोन दिवस लोटे औद्योगिक क्षेत्रासह परिसरातील गावांच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला. लोटेतील काही मोठ्या उद्योजकांकडे पाणी साठवण्यासाठी साठवण टाक्या आहेत. त्यामुळे एखादा अपघात झाला तरी किमान आठ दिवस पुरेल इतके पाणी या कंपन्या साठवून ठेवतात. काही कारखानदारांचे उत्पादन पाण्यावर अवलंबून आहे. त्यांना दैनंदिन पाणी लागते. लोटे एमआयडीसीला दिवसाला २४ एमएलडी पाणी पुरवले जाते. यातील काही पाणी लोटे परिसरातील ११ गावांना पुरवले जाते. लोटेचे औद्योगिक वसाहतीतील पाण्याचे नैसर्गिक स्रोत दूषित झाले आहेत. त्यामुळे या गावांना एमआयडीसी पाणीपुरवठा करते. सोमवारी पाणीपुरवठा बंद झाल्यानंतर या परिसरातील ११ गावांना विकत पाणी घ्यावे लागले. पाणीपुरवठा कधी सुरळीत होईल यासाठी या गावातील ग्रामस्थ एमआयडीसीकडे वारंवार विचारणा करत होते.