खड्ड्यांमुळे वाहतुकीचा खेळखंडोबा
गायमुख घाट रस्त्याची दुरवस्था
ठाणे शहर, ता. ११ (बातमीदार) : घोडबंदर महामार्ग सध्या वाहतुकीसाठी महासंकट देणारा ठरत आहे. या मार्गाने माजिवडा ते वर्सोवा हे ३० मिनिटांचे पार करण्यासाठी वाहनचालकांना दोन ते तीन तासांचा वेळ लागत आहे. या महामार्गावर असलेल्या गायमुख घाटावरील खड्डे मुख्य अडथळे निर्माण करणारे असून गेले तीन दिवस येथे वाहनांच्या मोठ्या रांगा लागत आहेत. घाटावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनाची गती प्रचंड मंदावत असल्याने वर्सोवा चौकाकडून येणारी आणि गुजरातकडे अवजड वाहनांची कोंडी होत आहे. पडलेल्या खड्ड्यांमधून रस्त्यावर धुळीचे साम्राज्य पसरले असून, वाहन चालवणे कठीण झाले आहे.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामधून गेलेला गायमुख घाट घोडबंदर मार्गावरील वाहतुकीचा मुख्य मार्ग आहे. घाटाचे वळण आणि उतार तीव्र असल्याने जड-अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी तो धोकादायक ठरत आहे. वन विभागात बांधण्यात आलेल्या या घाटाचे नियोजन चुकल्याने तो अपघात आणि वाहतूक कोंडीचे कारण ठरत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पावसाळ्यापूर्वी अनेकदा घाटाची दुरुस्ती केली आहे, परंतु घाटाची खड्ड्यांपासून सुटका होताना दिसत नाही. सध्या घाटावर चढणीच्या मार्गावर मोठे खड्डे पडले आहेत. अवजड वाहनांच्या वजनाने तीन महिन्यांपूर्वी रस्त्यावर केलेले डांबराचे मास्टिंग निघाले असून, काही ठिकाणी ३० फुटांहून अधिक लांबीचे खड्डे तयार झाले आहेत. त्यामधून हलकी वाहने चालवणे कठीण झाले आहे. रस्त्यावर मास्टिंग केलेली खड्डी पसरली असून, दुचाकी घसरण्याचे प्रमाण वाढले आहे.
घाटाच्या उतारावरदेखील अशीच परिस्थिती आहे. वळणावर रस्त्याच्या बाजूला पाणी वाहण्यासाठी तयार केलेले गटारे जड-अवजड वाहनांच्या अपघातासाठी कारणीभूत ठरत आहेत. ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या वाहिनीवर घाटमाथ्यावर प्रचंड वळण असून, तेथून कंटेनरसारखी वाहने वळवणे कठीण होत आहे. त्यामुळे वाहने बंद पडणे, गटारात जाणे, समोरील वाहनावर धडकणे अशा घटना घडत आहेत. परिणामी हा घाट कोंडीचे मुख्य कारण ठरत आहे.
६०० मीटरचा रस्ता खड्ड्यात
मिरा-भाईंदर महापालिकेच्या हद्दीतील सुमारे ६०० मीटरचा रस्ता खड्ड्यात गेला आहे. घाटाच्या आधीचा हा रस्तादेखील कोंडी करणारा ठरत आहे. त्यामुळे ठाण्याच्या दिशेने येणारी वाहतूक थेट वर्सोवा चौकापर्यंत बाधित होते. त्याचा परिणाम घोडबंदर वाहतुकीवरदेखील होतो. परिणामी हा रस्ता तातडीने दुरुस्त करावा, असे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिरा-भाईंदर महापालिकेला दिलेले आहेत आणि या कामावर ठाणे जिल्हा अधिकाऱ्यांनी लक्ष ठेवायचे, असे निर्देशदेखील शिंदे यांनी दिलेले आहेत, मात्र असे असतानाही मिरा-भाईंदर महापालिकेच्या हद्दीतील हा रस्ता वाहनचालकांसाठी प्रचंड त्रासदायक झाला आहे.
शुक्रवारी आंदोलन
गायमुख घाट आणि घोडबंदर मार्गावर निर्माण झालेल्या खड्ड्यांमुळे घोडबंदर परिसरातील रहिवासी त्रस्त झाले असून, ते शुक्रवारी (ता.१२) रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहेत. गायमुख घाटावर पडलेले खड्डे बुजवण्यासाठी खडीचा वापर केला जात असून, या खडीवरून जड-अवजड वाहनांचे टायर जागेवर जागेवर फिरतानाच्या घटना घडत आहेत. त्यामुळे खड्डे भरण्यासाठी वापरलेली खडीदेखील वाहतूक कोंडी करणारी ठरत आहे.
घाट विनाकारण वन विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विभागाच्या वादात अडकला आहे. वन विभागाकडून घाटाच्या रुंदीकरणाकरिता परवानगी मिळत नसल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे म्हणणे आहे, तर सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलेल्या त्रुटी दूर केल्या जात नसल्याने परवानगी देणे शक्य होत नसल्याचे वन विभागाकडून सांगितले जाते. त्यामुळे शासनाने यातून मार्ग काढून हे काम त्वरित सुरू करायला पाहिजे. आम्ही स्थानिक नागरिक वारंवार तक्रारी करूनही त्यावर कार्यवाही होत नाही.
नरेश मणेरा, माजी उपमहापौर, ठाणे