आशिया कप 2025 स्पर्धेच्या थराराला 9 सप्टेंबरपासून सुरुवात झाली. या स्पर्धेतील पाचव्या सामन्याची साऱ्या क्रिकेट चाहत्यांना प्रतिक्षा आहे. या सामन्याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष आहे. हा 2 कट्टर आणि पारंपरिक प्रतिस्पर्धी संघात होणार आहे. रविवारी 14 सप्टेंबरला आशिया कप स्पर्धेतील पाचव्या सामन्यात भारत विरुद्ध पाकिस्तान हे 2 शेजारी देशांचे क्रिकेट संघ आमनेसामने असणार आहेत. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे. सूर्यकुमार यादव या सामन्यात भारताचं नेतृत्व करणार आहे. तर सलमान आगा पाकिस्तानच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहे. या सामन्यानिमित्ताने उभयंसघातील आतापर्यंतचे आकडे कसे आहेत? हे जाणून घेऊयात.
यंदा 17 व्या आशिया कप स्पर्धेचं टी 20 फॉर्मटने आयोजन करण्यात आलं आहे. आगामी 2026 टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. यंदाची टी 20 आशिया कप स्पर्धेची तिसरी वेळ आहे. याआधी 2016 आणि 2022 साली टी 20 आशिया कप स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे.
टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत एकूण 13 टी 20i सामने झाले आहेत. भारतीय संघाने या 13 पैकी सर्वाधिक सामने जिंकले आहेत. भारतीय संघ कायमच पाकिस्तानवर वरचढ राहिला आहे. भारताने 13 पैकी 9 वेळा पाकिस्तानचा धुव्वा उडवला आहे. तर पाकिस्तानला फक्त 3 टी 20i सामनेच जिंकता आले आहेत. पाकिस्तानने टीम इंडिया विरुद्ध शेवटचा टी 20i सामना हा आशिया कप स्पर्धेतच जिंकला होता. पाकिस्तानने 3 वर्षांपूर्वी 2022 साली टीम इंडियावर 5 विकेट्सने विजय मिळवला होता. मात्र त्यानंतर झालेल्या 2 टी 20i सामन्यांमध्ये भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला होता.
वनडे आशिया कप स्पर्धेतही टीम इंडियाच पाकिस्तानवर वरचढ राहिली आहे. वनडे आशिया कप स्पर्धेत उभयसंघात एकूण 15 सामने झाले आहेत. भारताने 15 पैकी 8 सामने जिंकले. पाकिस्तानने भारताला 5 सामन्यांमध्ये पराभूत केलं. तर 2 सामन्यांचा निकाल लागू शकला नाही.
भारतीय संघ टी 20i क्रिकेटमध्ये पहिल्या स्थानी विराजमान आहे. भारताने गेल्या काही वर्षांत टी 20i क्रिकेटमधील आपला दबदबा कायम ठेवला आहे. रोहित शर्मा याने भारताला 2024 साली टी 20i वर्ल्ड कप जिंकून दिला. रोहितच्या निवृत्तीनंतर सूर्यकुमार यादव याने नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारली. सूर्याच्या नेतृत्वात भारताने आतापर्यंत एकही टी 20i मालिका गमावलेली नाही. यावरुन टीम इंडियाची टी 20i क्रिकेटमधील कामगिरी कशी आहे याचा अंदाज येतो. भारतीय चाहत्यांना पाकिस्तान विरुद्ध 14 सप्टेंबरला होणाऱ्या सामन्यातही अशीच कामगिरी अपेक्षित आहे.