आशिया कप स्पर्धेतील पदार्पणाच्या सामन्यात ओमान क्रिकेट संघाने सर्वांना प्रभावित केलं आहे. ओमानने आशिया कप 2025 स्पर्धेतील चौथ्या सामन्यात पाकिस्तान विरुद्ध पदार्पण केलं. पाकिस्तानच्या तुलनेत नवख्या असलेल्या ओमानने या स्पर्धेतील आपल्या पहिल्याच सामन्यात छाप सोडली. ओमानच्या गोलंदाजांनी चिवट आणि धारदार बॉलिंग करत पाकिस्तानला मोठी धावसंख्या करण्यापासून यशस्वीरित्या रोखण्यात यश मिळवलं. ओमानसमोर पाकिस्तानला 20 ओव्हरमध्ये 8 च्या रनरेटने धावा करता आल्या. त्यामुळे ओमान आशिया कप स्पर्धेत विजयी सुरुवात करत पाकिस्तान विरुद्ध मोठा उलटफेर करणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
पाकिस्तानने ओमानसमोर 161 धावांचं आव्हान ठेवलं आहे.पाकिस्तानने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 160 धावा केल्या. पाकिस्तानसाठी विकेटकीपर मोहम्मद हारीस याने सर्वाधिक धावा केल्या. हारीसने केल्या खेळीमुळे पाकिस्तानला 100 पार मजल मारता आली. हारीसने अर्धशतकी खेळी केली. तर दोघांनी 20 पेक्षा अधिक धावा केल्या. एकाने 10 पेक्षा अधिक धावांचं योगदान दिलं. दोघांना भोपळाही फोडता आला नाही. तर इतर फलंदाज ओमानसमोर ढेर झाले.
पाकिस्तानने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. ओमानच्या फैसल शाह याने सामन्यातील दुसऱ्याच बॉलवर पाकिस्तानच्या सॅम अयुब याला झिरोवर आऊट करत पहिला झटका दिला. त्यानंतर साहिबजादा फरहान आणि मोहम्मद हारीस या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 85 धावांची भागीदारी केली. ओमानने पाकिस्तानला 89 धावांवर दुसरा झटका देत ही सेट जोडी फोडली.आमिर कलीम याने साहिबजादा याला 29 रन्सवर आऊट केलं.
ओमानने त्यानंतर पाकिस्तानला ठराविक अंतराने झटके देणं सुरु ठेवलं. त्यामुळे पाकिस्तानच्या धावांच्या गतीला ब्रेक लागला. परिणामी पाकिस्तानला 160 पार पोहचता आलं नाही. हारीसने 43 बॉलमध्ये 3 सिक्स आणि 7 फोरसह 66 रन्स केल्या. मोहम्मद नवाझ याने 19 धावांचं योगदान दिलं. तर फखर झमान याने नाबाद 23 धावा केल्या. कॅप्टन सलमान अली आगा याला भोपळाही फोडता आला नाही. तर इतरांना दुहेरी आकड्यापर्यंतही पोहचता आलं नाही.
ओमान 161 धावा करणार?
ओमानकडून एकूण 7 जणांनी बॉलिंग केली. त्यापैकी तिघांनाच विकेट मिळवता आल्या. मात्र काहींचा अपवाद वगळता इतरांनी चिवट बॉलिंग केली. फैसल शाह आणि आमिर कलीम या दोघांनी सर्वाधिक आणि प्रत्येकी 3-3 विकेट्स मिळवल्या. तर मोहम्मद नदीम याने 1 विकेट मिळवली.