हैदराबाद गॅझेटच्या जीआरनंतर राज्यात मराठा समाज आणि ओबीसी समाज आमने-सामने आल्याचं चित्र आहे. यावर बोलताना आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. आज शरद पवार यांच्या हस्ते नाशिकमध्ये दादासाहेब गायकवाड सभागृहाचं उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते.
नेमकं काय म्हणाले शरद पवार?
महाराष्ट्रात सामाजिक ऐक्याची वीण उसवली जात आहे, असं वाटतंय. सामाजिक वीण जपण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे, वाटेल ती किंमत मोजायला तयार आहे, मात्र सामाजिक ऐक्य जपायला हवं, असं वक्तव्य शरद पवार यांनी राज्यात सध्या सुरू असलेल्या मराठा आणि ओबीस संघर्षाच्या पार्श्वभूमीवर केलं आहे.
पुढे बोलताना शरद पवार यांनी म्हटलं की, हा अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम आहे. दादासाहेब गायकवाड यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रोत्साहन दिलं, त्यामुळे ते नोकरी सोडून समाजकारण आणि राजकारणात आले, बाबासाहेबांनी पक्ष काढला होता, दादासाहेब गायकवाड यांना त्या पक्षातून उमेदवारी मिळाली होती, आणि ते निवडून देखील आले. तेव्हाचा काळ वेगळा होता, तो संयुक्त महाराष्ट्राचा काळ होता. त्या चळवळीमध्ये नाशिकचा वाटा मोठा आहे. नंतर महाराष्ट्र राज्य निर्माण झाले. तेव्हा महाराष्ट्राचं नेतृत्व यशवंतराव चव्हाण करत होते. तेव्हाच देशावर मोठं संकट आलं, चीनने भारतावर आक्रमण केलं. त्यावेळी अस्वस्थता निर्माण झाली. चीनचे आक्रमण झाले तेव्हा संरक्षण खात्याची जबाबदारी व्यवस्थित पाळली गेली नाही, म्हणून तेव्हाच्या संरक्षण मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला.
तेव्हा यशवंतराव मुख्यमंत्री होते, त्यांना नेहरूंनी बोलावून घेतले. चीनच्या आक्रमणानंतर सैन्यदलाचं मनोबल खचलं होतं, तेव्हा चव्हाण साहेबांनी जबाबदारी घेतली होती. देशाच्या दृष्टीने ही अत्यंत महत्त्वाची बाब होती. 1957 ला संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर 62 ला यशवंतरव चव्हाण हे लोकसभेचे सदस्य झाले. नाशिकने चव्हाण साहेबांना बिनविरोध निवडून दिले हा इतिहास आहे. दादासाहेब यांच्या निमित्ताने काँग्रेससोबत आरपीआयची पहिल्यांदा युती झाली. सामाजिक ऐक्य जपण्यासाठी महाराष्ट्राने प्रयत्न केले, त्याचे श्रेय यशवंतराव चव्हाण आणि दादासाहेब गायकवाड यांना दिले पाहिजे, असं यावेळी शरद पवार यांनी यावेळी म्हटलं आहे.