rat12p16.jpg-
91028
दापोली ः कर्दे समुद्रकिनाऱ्यावर उलटलेली थार गाडी.
rat12p17.jpg-
91029
उलटलेली थार जेसीबीच्या साह्याने सरळ करताना नागरिक.
--------------
कर्दे समुद्रकिनारी पर्यटकांची मोटार उलटली
जीवितहानी टळली ; सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. १२ः तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या कर्दे समुद्रकिनारी गुरूवारी (ता. ११) दुपारी साडेचारच्या सुमारास मोटार उलटली. समुद्राच्या पाण्यात भरधाव वेगाने चालवल्यामुळे अचानक नियंत्रण सुटले व गाडी उलटली. या अपघातात सुदैवाने मोठी जीवितहानी झाली नाही; मात्र गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
या घटनेनंतर किनाऱ्यावरील पर्यटक आणि स्थानिक नागरिकांची धावपळ उडाली. पाण्यात उलटलेल्या गाडीला बाहेर काढण्यासाठी स्थानिक नागरिकांसह जेसीबीची मदत घेण्यात आली. काही काळासाठी किनाऱ्यावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. निष्काळजी व बेफिकीर पर्यटकांमुळे सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने योग्य नियमावली तयार करून ती काटेकोरपणे अंमलात आणावी, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.
कोट
वारंवार सूचना करूनही काही पर्यटक समुद्रकिनाऱ्यावर गाड्या भरधाव वेगाने चालवतात. समुद्राच्या वाळूवर वेगाने वाहन नेल्यास अपघात होण्याची शक्यता जास्त असते. यापूर्वीही लहान-मोठे अपघात घडले आहेत. गुरूवारची घटना अधिक गंभीर स्वरूपाची होती. याबाबत पोलिसांना ग्रामपंचायतीमार्फत पत्र देणार आहे. अशा वाहनचालकांवर त्वरित कारवाई होणे आवश्यक आहे तरच या घटनांना आळा बसेल. यासाठी संपूर्ण किनारपट्टीला किमान सुट्टीच्या दिवशी तरी पोलिस कर्मचारी असणे फारच आवश्यक आहे.
- सचिन तोडणकर, सरपंच, कर्दे