Shivendra Raje Bhosale : शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडून सातारा गॅझेटचा आढावा, अहवालाबाबत ठोस माहिती नाही
esakal September 14, 2025 06:45 AM

पुणे : मराठा आरक्षण लागू करण्यासंबंधी ‘सातारा गॅझेट’चा अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या विभागीय आयुक्तांकडून आरक्षण समितीचे सदस्य आणि सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी शुक्रवारी (ता. १२) आढावा घेतला. मात्र, अहवालाबाबत आणि आढाव्याबाबत कोणतीही ठोस माहिती देण्यास नकार दिला.

मराठा आरक्षणाबाबत आंदोलकांकडून सातारा गॅझेटची सातत्याने मागणी करण्यात येत होती. या मागणीबाबत दबाव वाढत गेल्यानंतर सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भातही प्रक्रिया लवकरच सुरू होईल, अशी माहिती मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती.

त्यानंतर आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांना सातारा गॅझेटचा अभ्यास करून अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत. शुक्रवारी भोसले यांनी याबाबतच्या कार्यवाहीची माहिती पुलकुंडवार यांच्याकडून घेतली. या वेळी मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील उपस्थित होते.

भोसले म्हणाले की, उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी सातारा गॅझेटबद्दल विभागीय आयुक्तांना सूचना दिल्या आहेत. या सूचनाबद्दल चर्चा केली. पुढे काही जास्त चर्चा झाली नाही. सातारा गॅझेटबद्दल अधिकृत बैठक नव्हती. उपसमितीची बैठक घेण्याचे अधिकार हे अध्यक्षांना आहेत.

सातारा गॅझेटचा अभ्यास करून तो अहवाल तीन ते चार दिवसात सादर करावा, अशा सूचना दिलेल्या आहेत. यावर पुणे विभाग स्तरावर काय झाले, याबाबत चर्चा केली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.